देवलापारचे ठाणेदार सक्तीच्या रजेवर
By Admin | Updated: May 22, 2014 02:18 IST2014-05-22T02:18:35+5:302014-05-22T02:18:35+5:30
वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित

देवलापारचे ठाणेदार सक्तीच्या रजेवर
करवाही : वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवारी देवलापार पोलीस ठाण्याला घेराव व नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्याची दखल घेत ठाणेदाराला सक्तीच्या रजेवर पाठविले तर अन्य दोघांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. रामलाल आत्राम (६३, रा. वरघाट, ता. रामटेक) असे मृत वृद्धाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे, शिपाई राजेश पाली यांच्यासह अन्य पोलीस मोटरसायकलींवर वरघाट येथे आले होते. यातील एकाने रामलालला कट मारला. त्यामुळे रामलालने पोलिसांना शिवीगाळ केली. तो दारू पिऊन होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र रक्तदाब त्यातच अतिदारू पिला असल्याने रामलालची वैद्यकीय तपासणी न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून रामलालला पोलीस ठाण्यात आणून बसण्यास सांगितले. अटक केली नव्हती. रात्र झाल्याने पोलिसांनी दुसर्या दिवशी सकाळी गावाला जाण्यास सांगितले. परंतु, रात्री २ वाजताच्या सुमारास रामलाल हा पायी गावात गेला. पोलीस ठाण्यातून रामलाल कुठे गेला, याचा शोध घेत पोलीस त्याच्या गावी गेले असता तो घरी दिसल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र पोलिसांच्या वारंवार होणार्या अशा त्रासामुळे धास्तावलेल्या रामलालने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे पोलिसांवर रोष निर्माण होऊन प्रकरण तापले. आत्महत्येस पोलिसांना कारणीभूत धरत सोमवारी दुपारच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी रामलालचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला व रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. रोडवर टायर जाळले. नारायण देवगडे, राजेश पाली यांच्यासह इतर सहभागी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांनी नागरिकांना दोषी असलेल्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल. त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल तसेच ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यानुसार ठाणेदार यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे तर सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे आणि शिपाई राजेश पाली यांची मुख्यालयात बदली केली. (वार्ताहर)