फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वतंत्र बाजारासाठी जागा लिजवर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:24+5:302021-01-08T04:24:24+5:30

नागपूर : फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक स्वतंत्र बाजाराची उभारणी करावी आणि त्यासाठी वर्धा रोडवर न्यू इंग्लिश शाळेमागील कृषी विभागाची ...

Lease space for a separate market for flower growers | फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वतंत्र बाजारासाठी जागा लिजवर द्या

फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वतंत्र बाजारासाठी जागा लिजवर द्या

नागपूर : फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक स्वतंत्र बाजाराची उभारणी करावी आणि त्यासाठी वर्धा रोडवर न्यू इंग्लिश शाळेमागील कृषी विभागाची ४.५ एकर जागा लिजवर उपलब्ध करून देण्याची मागणी महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत यांनाही निवेदन दिले आहे.

ही जागा मध्यवर्ती भागात असून वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त आहे. विक्रेत्यांना स्वतंत्र जागा आणि फुले दीर्घकाळ टिकण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असणार आहे. असोसिएशनने कार्यकारिणी सभेत जागेसाठी ६ जुलै २०२० रोजी ठराव पारित केला आहे. जागा लिजवर दिल्यास सुविधायुक्त, गुणवत्तापूर्ण बांधकाम करून जागेचा पुरेपूर उपयोग करून विदर्भातील एकमेव स्वतंत्र शेतकरी फूलबाजार शेतकऱ्यांसाठी तयार करण्यासाठी असोसिएशन कटिबद्ध आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, शहरातील मुख्य फूल बाजार १९९४ पासून सीताबर्डी येथील नेताजी मार्केटमध्ये मनपाच्या जागेवर आहे. ही जागा २२ हजार चौरस फूट असून मनपाने असोसिएशनला दिली आहे. पार्किंग, खरेदी-विक्रीचे व्यवहार पॅकेजिंग, पार्सलिंग आणि वाहतुकीच्या दृष्टीने अपुरी आहे. जागेलगत अतिक्रमण वाढले आहे. बाजारात अनेक अडचणी असल्यानंतरही दररोज १५ ते २० लाख रुपयांचा व्यवसाय होतो. राज्य शासनाने शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अडतमुक्त धोरण आणले आहे. त्यानुसार असोसिएशनचे संस्थापक अण्णासाहेब रणनवरे यांनी संस्थेचा उपविधी तयार केला आहे. त्यानुसार बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.

या भागात वाहतुकीची कोंडी होत असल्याने फूल बाजाराच्या संचालनास नेहमीच अडथळा निर्माण होतो. तसेच मनपाने असोसिएशनला माहिती न देता बाह्य व्यक्तींना बाजारातील ओट्याचे नियमबाह्य पद्धतीने वाटप केले आहे. नागपूरचा मोठा फूल बाजार विदर्भासाठी महत्त्वाचा असून संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून फुलांना मागणी असते. ६० ते १०० किमी क्षेत्रातील शेतकरी फुलांच्या शेतीकडे रोख पीक आणि जोडधंदा म्हणून पाहतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी पॉली हाऊस, ग्रीन हाऊसमधील फुलांची बाजारात विक्री करतात. मागणी आणि पुरवठ्यानुसार बाहेर देशातूनही फुलांची आवक होते. येथे ३१ अधिकृत विक्रेते कार्यरत असून शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली फुलांची विक्री करतात. बाजारावर माथाडी कामगार आणि सजावट करणाऱ्या कारागिरांची उपजीविका चालते. कोरोनामुळे बाजार अनेक महिने बंद होता. सध्याही फुलांची विक्री पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने विकसित बाजार उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांसाठी सोईचे होईल, असे रणनवरे म्हणाले. जागेलगतच ट्रान्सपोर्ट हब होत असून वाहतूक आणि व्यवहारासाठी ही जागा सुरक्षित असल्याने असोसिएशनला मंजूर करावी, अशी मागणी रणनवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Lease space for a separate market for flower growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.