पंक्चर झालेल्या आयुष्यावर शिक्षणाची मात
By Admin | Updated: June 10, 2015 03:08 IST2015-06-10T03:08:56+5:302015-06-10T03:08:56+5:30
वाहनांच्या पंक्चरच्या प्रतीक्षेत बसलेल्या वडिलांची आणि पदरमोड करून घर चालविणाऱ्या आईची होणारी धावपळ पाहून प्राची आणखी खंबीर झाली.

पंक्चर झालेल्या आयुष्यावर शिक्षणाची मात
नागपूर : वाहनांच्या पंक्चरच्या प्रतीक्षेत बसलेल्या वडिलांची आणि पदरमोड करून घर चालविणाऱ्या आईची होणारी धावपळ पाहून प्राची आणखी खंबीर झाली. अभ्यासात सुधारणा केली. आतापर्यंत साधारण गुण घेणाऱ्या प्राचीने दहावीत ८३.६० टक्के गुण घेतले. एवढे गुण घेण्याची ही तिची पहिलीच वेळ. ती शाळेत दुसरी आली.
भवानीनगर, पारडी येथील रहिवासी प्राची रवी पाटील त्या विद्यार्थिनीचे पूर्ण नाव. लकडंगज येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची ती विद्यार्थिनी. प्राचीचे वडील दहावी नापास. परंतु मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड असते.
यासाठी दोन पैसे जास्तीचे मिळावे म्हणून पहाटेपासूनच रस्त्याच्या कडेला पंक्चरचे दुकान लावतात. यात प्राचीही मदत करते. कधी वाहनांमध्ये हवा भरण्यात तर कधी पंक्चर काढण्यात.
प्राची म्हणाली, रस्त्याच्या कडेला बसून पंक्चर दुरुस्त करणाऱ्या बाबांना पाहून मन कासावीस होते. पूर्वी अभ्यासात सर्वसाधारण होते. परंतु दहावीची परीक्षा जवळ येताच मेहनत घेतली.
रात्री ३ वाजता उठून अभ्यास करायची. या प्रयत्नाला यशही आले. कधी नव्हे ते ८३.६० टक्के गुण मिळाले.
भविष्यात आयएएस अधिकारी व्हायचे हे स्वप्न आहे. पंक्चरवाल्याची मुलगी म्हणून हिणवणाऱ्यांना दाखवून द्यायचे आहे.
यापुढे स्वत:च्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: घेणार आहे. यासाठी शिकवणी वर्ग चालविण्याचा विचार आहे, असेही ती म्हणाली.(प्रतिनिधी)