जगण्याच्या समृद्धतेसाठी संगीत शिकावे
By Admin | Updated: April 29, 2015 02:46 IST2015-04-29T02:46:42+5:302015-04-29T02:46:42+5:30
अनेकांना गायक किंवा वादक कलावंत व्हायचे नसते. या क्षेत्रात त्यांना भविष्य घडवायचे नसल्याने ते संगीत शिकण्याकडे वळतच नाही. पण येथेच चूक होते.

जगण्याच्या समृद्धतेसाठी संगीत शिकावे
नागपूर : अनेकांना गायक किंवा वादक कलावंत व्हायचे नसते. या क्षेत्रात त्यांना भविष्य घडवायचे नसल्याने ते संगीत शिकण्याकडे वळतच नाही. पण येथेच चूक होते. केवळ कलावंत होण्यासाठी संगीत शिकणे आवश्यक नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी संगीताच्या शिक्षणामुळे ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. त्यामुळे सादरीकरणासाठी संगीत शिकायचे नसले तरी स्वत:च्या जगण्याच्या समृद्धतेसाठी संगीत शिकायलाच हवे. आपले मन, बुद्धी आणि शांततेसाठी संगीत आवश्यक आहे, असे मत सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी मंगळवारी व्यक्त केले.
रायसोनी शिक्षण समूहाचे संस्थापक जी. एच. रायसोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धा हाऊस, किंग्जवे येथे त्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेत जुन्या - नव्या गायक-वादकांना मार्गदर्शन करतानाच त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत आणि प्रात्यक्षिकही सादर केले. विशेषत: या कार्यशाळेत पाच वर्षाच्या बालिकेपासून ७२ वर्षाच्या ज्येष्ठ कलावंतांनीही सहभाग घेतला. देवकी पंडित यांनी शास्त्रीयच संगीत कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले. मुळात अनेकांना सुगम गायनासाठी शास्त्रीय संगीत शिकण्याची गरज नाही, असे वाटते.
पण सुगम गाण्यासाठीही शास्त्रीय संगीताची तयारी असावीच लागते त्याशिवाय गाणे रंगत नाही. संगीतात रियाज अतिशय महत्त्वाचा आहे. रियाज कशा पद्धतीने करावा आणि श्वासांवर कसे नियंत्रण ठेवावे, याबाबतही त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. गायनासाठी प्राणायाम गरजेचा आहे. कारण गायन करताना आपला आवाज हेच एक साधन असते. आपला रियाज आणि प्राणायामाची सवय आपल्या दीर्घ ताना आलापींना उपयोगी पडते. त्यासाठी श्वासावरचे नियंत्रण प्राणायामानेच शक्य होते. रियाजानंतर आपले संगीत आणि प्राणायाम याचे अद्वैत साधते आणि संगीतच आपला प्राणायाम होतो. तेच ‘मेडिटेशन’ होते.
संगीत शिक ल्यावर प्रत्येकच माणूस कलावंत होऊ शकत नाही पण किमान तो चांगला रसिक होतो. रसिकांना संगीत समजले तर त्यांना संगीताचा अधिक आनंद घेता येतो. हा आनंद आयुष्य व्यापून उरणारा आहे. आपल्या मनाच्या शांततेसाठी, बुद्धीच्या प्रगल्भतेसाठी आणि कुठल्याही क्षेत्रातील क्रिएटिव्ह काम करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. चांगले श्रोते यातून तयार होतात. गायक योग्य गातो आहे वा नाही हे कळण्यासाठी रसिकांना संगीत शिकायला हवे.
संगीत शिकताना गुरूअत्यंत महत्त्वाचा असतो, कारण गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवीत असतो. सुप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीत शिकले. त्यांनी सांगितलेल्या जागा मला जमत नव्हत्या तेव्हा त्यांनी मला १००८ वेळा तालीम कर, असे रागाने मला म्हटले. गुरूने सांगितले म्हणून खरेच घरी त्याची १००८ वेळा तालीम केली आणि तो स्वर मला नेमकेपणाने सापडला. आपली उणीव गुरूशिवाय निघत नाही आणि आपल्या चुका गुरूंनाच कळत असतात.
त्यामुळे संगीतात गुरूचे महत्त्व वेगळे आहे. याप्रसंगी त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. या कार्यशाळेचे संयोजन मृणाल नाईक यांनी केले. या शिबिरासाठी संस्कार भारतीचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सर्वांच्या आग्रहाखातर देवकीतार्इंनी काही सुगम गीते सादर केली. सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या...’ या गझलने त्यांनी समारोप केला. (प्रतिनिधी)