गळते हायकोर्ट इमारत
By Admin | Updated: July 23, 2014 00:56 IST2014-07-23T00:56:32+5:302014-07-23T00:56:32+5:30
उपराजधानीत पावसाने दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले. बहुसंख्य सर्वच चौकातील

गळते हायकोर्ट इमारत
नागपूर : उपराजधानीत पावसाने दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले. बहुसंख्य सर्वच चौकातील रस्ते पाण्याखाली गेले. नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. मंगळवारच्या पावसाने नागपूरकर सुखावले असले तरी महापालिकेचा पावसापूर्वीचे नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. लोकमत चमूने ‘आॅन दि स्पॉट’ जाऊन वस्त्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्षानुवर्षांपासूनच्या समस्या आजही कायम असल्याचे पहायला मिळाले. शासकीय मदतीची वाट पाहून हताश झालेल्या नागरिकांची या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड पहायला मिळाली. दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गृहिणींची पंचाईत झाली. पश्चिम नागपुरातील अनेक भागात भाजीविक्रेते आले नसल्यामुळे भाजी, फळे घेण्यासाठी भटकंती करावी लागली. शिवाय पावसामुळे दरदेखील वाढले असल्यामुळे मिळेल त्या दरात खरेदी करावी लागली.
नागपूर : इंग्रजांच्या काळात बांधलेल्या हायकोर्ट इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे किती दुर्लक्ष आहे याचा पुरावा मुसळधार पावसाने दिला. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केले नसल्यामुळे ही इमारत दुसऱ्या माळ्यावर वकिलांच्या संघटनेचे कार्यालय असलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी दिवसभर गळत होती. यावरून देशाचा हा सांस्कृतिक वारसा धोक्यात असल्याची प्रचिती येत आहे.
काही वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी झिरपून आत येते. पावसाचा जोर जास्त असल्यास पाण्याच्या धारा लागतात. आज अशीच परिस्थिती होती. पाणी गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी बादल्या ठेवाव्या लागल्या. बादल्या काही मिनिटांतच भरत होत्या. टाईल्सवरही पाणी साचले होते. हेरिटेज इमारतीत अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अर्थकारणावर जास्त भर असतो. परंतु, त्यांनी हेरिटेज इमारतींकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना अनेकांनी केली.
प्रशासनाची कुंभकर्णी झोप
गोपालनगर, प्रतापनगर परिसरातील नगरसेवक व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचरा साचून राहतो. शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्यामुळे रेती, गिट्टी रस्त्यांवरच पडून असते. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील कुठलीही कार्यवाही झाली नाही. पावसामुळे हा कचरा आणि रेती-गिट्टी वाहून आल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी गडर लाईनदेखील ‘चोक’ झाली असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
पश्चिम नागपूर बेहाल
पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. अनेक शाळांच्या परिसरात पाणी जमा झाल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. रामदासपेठ, प्रतापनगर, सोमलवाडा, खामला, देवनगर, लक्ष्मीनगर, बजाजनगर येथील अनेक भागात नागरिकांना पावसाचा फटका बसला.
नाल्याचा प्रवाह वाढला
शहरात सात नाले आहेत. यात हुडकेश्वर नाला, स्वावलंबीनगर नाला, शंकरनगर नाला, शांतिनगर, चांभारनाला, व हत्तीनाल्यांचा समावेश आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यांचा प्रवाह वाढला आहे.
टेकडी रोडवर साचले पाणी
नागपूर रेल्वेस्थानकावरून मानस चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यातून दुचाकी काढण्याची कसरत नागरिकांना करावी लागत होती. अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या या साचलेल्या पावसात बंद पडल्यामुळे त्यांची चांगलीच गैरसोय झाली. एखाद्या चारचाकी वाहनचालकाने जोरात गाडी नेल्यास या रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रवाशांना ओले होण्याची पाळी आली.
पावसाचा ‘रोमॅन्टिक’ रंग
मंगळवारी झालेला संततधार पाऊस कुणासाठी त्रासदायक ठरला, तर कुणी फुटाळा चौपाटीवर बसून त्याचा आनंद लुटला. अनेक तरुण-तरुणी धो धो पावसात छत्रीखाली बसून तलावात पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत होते. काही जण कारमध्ये बसून गरमागरम ‘भुट्ट्या’चा आस्वाद घेत होते. सायं. ५ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला तेव्हा येथील गर्दी पुन्हा वाढली होती. गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या तलावातील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे.
पथदिवे बंद, पुलावर खड्डे
नागपूर: पाऊस पडला की उड्डाण पुलावरील खड्ड्यांनी तोंडवर काढणे आणि पथदिवे बंद असण्याचे प्रकार यंदाही निदर्शनास येत आहे. वर्धा मार्गावरील चिंचभुवन उड्डाण पुलावर मोठा खड्डा पडला आहे. यापूर्वी तो दोन वेळा सिमेट आणि गिट्टीच्या मिश्रणाने बुजवण्यात आला खरा. पण पाऊस पडला की ते सर्व मिश्रण वाहून जाते आणि खड्डा पुन्हा जैसे-थे. विशेष म्हणजे या पुलावरील दिवे बंद आहेत. पुल अरुंद आहे आणि वाहनांची वर्दळ अधिक असल्याने हा खड्डा अपघातास कारणीभूत ठरू शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे सोमलवाडा वस्तीनंतर थेट चिंचभुवन पुलापर्यत पथदिवे बंद आहेत. या मार्गावर अनेक हॉटेल्स असून तेथे रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची अडचण होते. रस्त्यावर अंधार असल्याने पुढचे काहीच दिसत नाही. रस्त्यावरची गिट्टी उखडल्याने वाहने घसरण्याचा धोका आहे. छत्रपती चौकापासूनपुढे वर्धा मार्गावर जड वाहनांची वर्दळ अधिक राहते. भरधाव जाणाऱ्या गाड्यांमुळे येथे अपघातही यापूर्वी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पथदिवे बंद असणे गैरसोयीचे ठरते. (प्रतिनिधी)