उमरेडमध्ये आमदाराविरोधात पत्रकबाजी
By Admin | Updated: July 11, 2014 01:15 IST2014-07-11T01:15:49+5:302014-07-11T01:15:49+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडमध्ये आमदार सुधीर पारवे यांच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी धीर सोडला आहे. पक्षाचा एक गट जोरात सक्रिय झाला असून गटाने आमदाराविरोधात

उमरेडमध्ये आमदाराविरोधात पत्रकबाजी
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडमध्ये आमदार सुधीर पारवे यांच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी धीर सोडला आहे. पक्षाचा एक गट जोरात सक्रिय झाला असून गटाने आमदाराविरोधात पत्रकबाजी सुरू केली आहे. ही पत्रके पोस्टाने पाठविली जात आहेत. उमरेडच्या राजकीय वर्तुळात या पत्रकबाजीची एकच चर्चा आहे.
उमरेडचे आ. सुधीर पारवे यांच्याविरोधातील हे पत्रक आहे. यासाठी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी ‘गोडबोले आमदार हटाव कृती समिती, उमरेड’ या नावाने समिती स्थापन केली आहे. त्या समितीने पत्रक प्रकाशित केले आहेत. त्यात भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभेच्या आमदाराबाबत स्थानिक जनता, कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे यात नमूद आहे. पक्ष संघटनेत रस न घेणे, मतदारसंघाच्या विकासाकरिता कोणतेही काम खेचून न आणणे, आमदारकीचा उपयोग करून भावाला गिट्टीखदान सुरू करून देणे आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्रक विशेषत: पोस्टाने पाठविण्यात येत आहे. तेही भाजपच्याच बूथप्रमुखांच्या घरी पोहोचत आहेत. त्यामुळे निश्चितच भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे हे कृत्य असावे, हे स्पष्ट होते.
आमदारावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत निष्क्रिय वर्तनामुळे मतदारसंघात कोणतेही नवीन काम येऊ शकले नाही. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वचक नाही, मतदारांची कामे होत नाही यामुळे जनता नाराज असून अशा आमदाराला जनता कंटाळली आहे. मतदारांमध्ये चिड निर्माण झाली आहे असे नमूद केले आहे. त्यातच अशा अकार्यक्षम आमदाराला पक्षाने पुन्हा तिकीट देऊ नये अन्यथा या मतदारसंघात भाजपचा पराभव होणे निश्चित आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकात नाव असलेल्यांपैकी भाजयुमोचे महामंत्री सुभाष कावटे यांना विचारणा केली असता पत्रकावर माझे नाव लिहून खोटी स्वाक्षरी केल्याचे त्यांनी सांगत या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. उमरेड भाजप कार्यालयाशी संपर्क साधला असता आमदाराचे स्वीय सहायक किशोर हजारे यांनी या पत्रकातील आरोप फेटाळून लावत कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)