समाजासाठी प्राणपणाने लढणारे नेतृत्व
By Admin | Updated: July 26, 2015 02:55 IST2015-07-26T02:55:34+5:302015-07-26T02:55:34+5:30
बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा व विचारांचे प्रगाढ अभ्यासक, संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक ,मुत्सद्दी राजकारणी आणि समाजालाच जीवन समर्पित करीत...

समाजासाठी प्राणपणाने लढणारे नेतृत्व
बौद्धांच्या सन्मानासाठी आमरण उपोषण : तुरुंगवासही भोगला
प्रा. जोगेंद्र कवाडे
बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा व विचारांचे प्रगाढ अभ्यासक, संसदीय लोकशाहीचे कट्टर समर्थक ,मुत्सद्दी राजकारणी आणि समाजालाच जीवन समर्पित करीत समाजासाठी प्रत्येक स्तरावर प्राणपणाने लढणारे कुशल नेतृत्व म्हणजे रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली धम्मक्रांती केली व लक्षावधी दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा भौतिक व आर्थिकदृष्ट्या विपन्न अवस्थेत असलेल्या दलितांना हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि देशामध्ये बौद्ध धम्माची प्रचंड लाट निर्माण झाली.
धर्मांतरामुळे नवदीक्षित बौद्धांना मानसिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यांच्या गरिबीची आणि दारिद्र्याची जाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणून धर्मांतर केलेल्या बौद्धांना आश्वस्त करण्यासाठी बाबासाहेब म्हणाले होते, ‘धर्मांतर जरी आपण केलं असलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या आरक्षणाचे अधिकार माझ्या खिशात शाबूत आहेत. हाच धागा पकडून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई, महामंत्री खा. ना.ह. कुंभारे व सी.एम. आरमुगम हे तिन्ही ज्येष्ठ नेते दिल्लीच्या ऐतिहासिक बोट क्लबवर बौद्धांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसले होते. तेव्हा देशामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी हे तिन्ही नेते तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे बौद्धांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन घेऊन गेले होते. बौद्धांना आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात, अशाप्रकारचा आग्रह दादासाहेब गवई, कुंभारे आणि आरमुगम यांनी धरला. तेव्हा मोरारजी देसाई यांनी ‘कुणी सांगितले तुम्हाला बौद्ध बनायला’अशाप्रकारचे तुच्छतापूर्वक वक्तव्य केले. त्याचीच परिणती म्हणून बौद्धांचा झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून व बौद्धांना आरक्षणाच्या सवलती मिळाल्याच पाहिजे या मागणीसाठी दिल्लीेच्या बोट क्लबवर तिन्ही नेते उपोषणावर बसले. संपूर्ण देशातील दलित-बौद्ध जनता ढवळून निघाली होती. देशभरात आंदोलन पेटले होते. १९७६ चा तो काळ होता. तेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. मी माझ्या पत्नीला घेऊन दिल्लीत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. उपोषणाला चार दिवस लोटले होते.
संपूर्ण देशातील दलित-बौद्ध समाजबांधव या तिन्ही प्रमुख नेत्यांसाठी चिंतित होती.आम्ही सातत्याने दादासाहेब गवई, कुंभारे आणि आरमुगम यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करीत होतो. ‘बचेंगे तो और लढेंगे’ अशी भूमिका घेऊन आम्ही त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करीत होतो. परंतु ते जुमायला तयार नव्हते. आताच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू, या जिद्दीने ते प्राणपणाने लढत होते. त्यांचे उपोषण दिल्लीपुरते नव्हते, तर ते देशभरात पोहोचले होते. महाराष्ट्रात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते.
ठिकठिकाणी रेल्वे रोको, रास्ता रोको सुरू होते. इंदिरा गांधी, शशी भूषण, शांतिभूषण यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी त्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. उपोषणाला आठ दिवस लोटले होते. कार्यकर्ते व समाजाच्या रेट्यामुळे नेत्यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन कायम होते. आम्ही कार्यकर्त्यांनी दिल्लीत भव्य मोर्चा काढला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहानंतरचा तो सर्वात मोठा मोर्चा होता.
या मोर्चामुळे केंद्र सरकारही घाबरले होते. त्यांनी गवई, कुंभारे व आरमुगम या नेत्यांसह आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये टाकले. तब्बल १४ दिवस आम्ही तुरुंगात होतो. दरम्यान, तुरुंगात असताना काही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला खूप मारले होते. तेव्हा गवई यांच्या नेतृत्वगुणाचा परिचय दिसून आला.
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याबाबत त्यांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली. रिपाइंचे ऐक्य झाले तेव्हा आम्ही चार खासदार लोकसभेवर निवडून गेलो. आम्ही तेव्हा नवखे होतो. परंतु दादासाहेब गवई यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव होता.
त्यांच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. संसदेत प्रश्न कसे मांडायचे. विविध संसदीय आयुधांचा वापर करून समाजाचे प्रश्न कसे मांडायचे. याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले. माझ्यासाठी तरी ते चालते-फिरते संसदीय विद्यापीठ होते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्याच्या विकासासाठी वाहून घेतले. त्यांच्या नेतृत्वगुण आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीवर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहिले आहे.