नितीन गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा नेते, कार्यकर्त्यांची निवासस्थानी रीघ
By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 22:28 IST2025-05-27T22:26:56+5:302025-05-27T22:28:49+5:30
व्यस्त वेळापत्रकातदेखील गडकरींनी काढला कार्यकर्त्यांसाठी वेळ

नितीन गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा नेते, कार्यकर्त्यांची निवासस्थानी रीघ
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धा मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. दिवसभर तेथे ‘हाऊसफुल्ल’ गर्दी दिसून आली. अनेक आमदारांनी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे काम करण्याची आणखी स्फूर्ती मिळते, अशा भावना गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सकाळी शेकडो कार्यकर्त्यांची गडकरी यांच्या निवासस्थानासमोर गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात गडकरी यांचे स्वागत करण्यात आले. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे औक्षण केले. यानंतर गडकरी यांनी घरी येणाऱ्या प्रत्येक नेता व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष फोन करून अथवा सोशल मीडियाद्वारे नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगढ विधानसभेचे अध्यक्ष रमणसिंह, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेते नाना पाटेकर, सनी देओल व विवेक ओबेरॉय, श्री श्री रविशंकर, गायिका अनुराधा पौडवाल, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा प्रामुख्याने समावेश होता. गडकरी यांच्या हस्ते सकाळी दिव्यांगांना ई-रिक्षाचे वाटपही करण्यात आले.
नेत्र व कर्ण तपासणी शिबिरांचे आयोजन
गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. भानूताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नागपुरात विविध ठिकाणी नेत्र व कर्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैशाली नगर उत्तर नागपूर, प्रबोधन कॉन्वेंट महाल, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान कार्यालय ग्लोकल मॉल आदी ठिकाणी हे आयोजन झाले.