लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रविवारी (दि. २३) देवलापार (ता. रामटेक) व बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यांवर धाडी टाकल्या. यात त्यांनी पाच बुकींवर गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून एकूण १९ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये चॅम्पियन ट्रॉफी दरम्यानच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याचे कळताच एलसीबीच्या पथकाने पाहणी केली. त्यांना एमएच-३१/सीएस-९९७२ क्रमांकाच्या कारमध्ये काही जण सट्टी स्वीकारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी कारमधील अनिकेत गणेश पखिड्डे (२२), मिलिंद रमेश जयस्वाल (४०) दोघेही, रा. देवलापार, ता. रामटेक रितिक विनोद दिवटे (२३, रा. वडंबा, ता. रामटेक) आणि सोनू श्याममनोहर गुप्ता, रा. सावनेर या चौघांविरुद्ध देवलापार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एलसीबीच्या पथकाने दुसरी कारवाई बुटीबोरी एमआयडीसी परिसरात असलेल्या बालभारती मैदानात केली. या ठिकाणी पोलिसांना प्रवीण महाकुलकर (३२, रा. रिधोरा सातगाव, ता. नागपूर ग्रामीण) हा एमएच-४०/सीएच-३३११ क्रमांकाच्या कारमध्ये बसून भारत-पाकिस्तान दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टी स्वीकारत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने प्रवीणसोबतच सुरज राव, रा. बुटीबोरी, ता. नागपूर ग्रामीण या दोघांविरुद्ध बुटीबोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यांच्याकडून १० लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बुकींची नवी शक्कलपूर्वी बुकी शहरातील खोली अथवा फार्म हाउस किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये बसून, सट्टा स्वीकारायचे. त्या ठिकाणी पोलिसांना धाडी टाकणे सोपे जायचे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बुकी आता त्यांचा हा व्यवसाय कारमध्ये बसून करतात. ते त्यांच्या कार निर्जन स्थळी, महामार्गालगत उभ्या ठेवतात. कुणकुण लागताच पळून जातात. या प्रकारामुळे बुकींना पकडणे पोलिसांना थोडे कठीण जाते.
९३ संशयितांना स्थानबद्ध करण्यात आले आहेनागपूर जिल्ह्यात क्रिकेट बेटिंगचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी चॅम्पियन ट्रॉफीतील क्रिकेट सामाने सुरू होण्यापूर्वीच ९३ संशयित बुकींना स्थानबद्ध केले आहे.
१९.११ लाखांचा मुद्देमाल हस्तगतएलसीबीच्या पथकाने या दोन्ही धाडींमध्ये एकूण १९ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात देवलापारच्या कारवाईतील आठ लाखांची कार, ३० हजार रुपयांचे तीन मोबाइल फोन, १० हजार ७०० रुपये रोख अशा ८ लाख ४० हजार ७०० रुपये तसेच बुटीबोरीच्या कारवाईतील १० लाखांची कार, ६५ हजार रुपयांचे दोन मोबाइल फोन व ४,५०० रुपये रोख अशा १० लाख ६९ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.