लक्ष्मीपूजन दणक्यात, शुभेच्छांचाही वर्षाव
By Admin | Updated: November 13, 2015 02:37 IST2015-11-13T02:37:04+5:302015-11-13T02:37:04+5:30
दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनासाठी बाजार खास सजले होते. लक्ष्मीपूजन साग्रसंगीत करता यावे म्हणून नागरिकांनीही चढ्या भावाने खरेदी केली.

लक्ष्मीपूजन दणक्यात, शुभेच्छांचाही वर्षाव
नवे वस्त्र परिधान करून लक्ष्मीचे स्वागत : नागरिकांनी दिल्या परस्परांना शुभेच्छा
नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनासाठी बाजार खास सजले होते. लक्ष्मीपूजन साग्रसंगीत करता यावे म्हणून नागरिकांनीही चढ्या भावाने खरेदी केली. जेथे स्वच्छता आणि शांतता असते तेथेच लक्ष्मी वास करते, अशी आपल्या संस्कृतीची मान्यता असल्याने दीपावलीपूर्वीच नागरिकांनी घराची रंगरंगोटी आणि स्वच्छता केली होती.
लक्ष्मीच्या स्वागतासाठी आंब्याच्या पानाचे तोरण आणि झेंडूच्या फुलांचा हार मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांनी लावला होता. लक्ष्मीपूजनाला अमावस्या असते पण लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी शहरभर दिव्यांची आरास आणि विद्युत रोषणाईने शहर झगमगले होते. पूजनासाठी लक्ष्मीची मातीची मूर्ती आणून तिचे पूजन करण्याची परंपरा आहे. बाजारात १५० ते ५०० रुपयांपर्यंत लक्ष्मीच्या मूर्ती उपलब्ध होत्या. झेंडूची फुले, पाच फळे, गुलाल, हळदी-कुंकू आदींनी बाजार सजला होता. समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा करताना प्रतिकात्मक स्वरूपात अनेक नागरिकांनी घरातील सोने-चांदीचे दागिने पूजेत ठेवले होते. पूजनानंतर बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आले. मुलांच्या हट्टासाठी अनेकांनी रोषणाई करणारे फटाके, रॉकेट, अनार आदींची खरेदी केली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ध्वनिप्रदूषण करणारे फटाके नागरिकांनी मोठ्या प्रमाणात टाळले. फुलझड्या, अनार फोडण्यात बच्चे कंपनी खूष होती.
लक्ष्मीपूजनाला नवीन वस्त्र धारण करून पूजन करण्याचा प्रघात आहे. बहुतेकांनी नवे वस्त्र खरेदी केले होते तर अनेकांनी सोवळे घालून पूजन केले. देवीला फराळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अर्थातच यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी गोड-धोड भोजनाचा बेत होता. उत्सवाच्या या वातावरणात नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीने दीपावलीच्या या सणाचा आनंद घेतला. बाजार तेजीत असल्याने फूलविक्रेता, फळविक्रेता आणि किरकोळ व्यापारी तसेच मिठाई विकणाऱ्या दुकानदारांनी मात्र व्यवसाय चांगला झाल्याचा आनंद व्यक्त केला. लक्ष्मीपूजन योग्य पद्धतीने व्हावे, याची काळजी घेताना नागरिकांनीही चढ्या भावाने खरेदी केली.
लोकांनी इको-फ्रेंडली फटाक्यांना पसंती दिली. कमी धुराचे तसेच आवाजविरहित फटाक्यांना अधिक पसंती दिली. लहान मुलांसाठी कमी आवाजाचे, रंगीबेरंगी फटाक्यांची जोरदार विक्री झाली. खरेदीत उत्साह होता, पण खर्चावर नियंत्रण ठेवून लोकांची फटाक्याची खरेदी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)