वकिलाला मारहाण अन धमकी, बोगस पत्रकार मुन्ना पटेल अटकेत

By योगेश पांडे | Published: March 12, 2024 10:51 PM2024-03-12T22:51:16+5:302024-03-12T22:51:29+5:30

मुन्ना पटेल हा स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो व खंडणीवसुली, धमकीची कामे करतो.

Lawyer beaten and threatened fake journalist Munna Patel arrested | वकिलाला मारहाण अन धमकी, बोगस पत्रकार मुन्ना पटेल अटकेत

वकिलाला मारहाण अन धमकी, बोगस पत्रकार मुन्ना पटेल अटकेत

नागपूर : विविध गुन्ह्यांत सहभागी असणारा बोगस पत्रकार मुन्ना पटेल उर्फ मुश्ताक खान याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याने एका वकिलाला मारहाण करत त्याच्याजवळची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. तसेच धमकीदेखील दिली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मुन्ना पटेल हा स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो व खंडणीवसुली, धमकीची कामे करतो. त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सोमवारी दुपारी त्याने ॲड.शाहबाज सिद्दीकी उर्फ अबरार सिद्दीकी (४२, जाफरनगर) यांना धमकी दिली. ते जिल्हा व सत्र न्यायालयाजवळील एका चहाच्या टपरीवर उभे होते. त्यावेळी मुन्ना पटेल तेथे पोहोचला. तू माझ्याविरोधात पोलिसांत खूप तक्रारी केल्या असून त्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर माझा खूप खर्च झाला असून ते पैसे तुझ्याकडूनच वसूल करेन, असे त्याने म्हटले. ॲड सिद्दीकी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर मुन्नाने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावली. त्याने खिशातून ब्लेडसारखी वस्तू काढत त्याने सिद्दीकी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. इतर वकिलांनी तेथे येऊन मुन्नाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फरार झाला. यात सिद्दीकी यांच्या गळ्याजवळ जखम झाली. त्यांनी मेयो इस्पितळात जात उपचार घेतले व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुन्नाला अटक केली आहे. या घटनेमुळे वकिलांमध्येही संतापाचे वातावरण आहे.

अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडून उकळले पैसे
मुन्नाची सरकारी कार्यालयात दहशत आहे. पत्रकार असल्याचे भासवून तो पैसे उकळतो. पैसे न दिल्याने त्याने केबिनमध्ये घुसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी त्याला अनेक महिन्यांनी अटक करण्यात आली होती. याआधीही तो वॉकर स्ट्रीटवर महिलांच्या आक्षेपार्ह क्लिपिंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आला होता. हॉटेल, रेस्टॉरेंट आणि बारचालकांकडूनही तो पैसे उकळतो. पैसे न दिल्यास बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देतो. त्याच्या भीतीमुळे अनेक पिडीत तक्रार दाखल करण्यास समोर येत नाही.

बोगस पत्रकारांची लगेच तक्रार करा
शहरात मुन्नासारखे इतरही अनेक बोगस पत्रकार आहेत. ते कुठल्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, पोर्टल किंवा मासिकाचे पत्रकार नसतानादेखील बोगस आयकार्ड घालून शहरात फिरत असतात. पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बाजारपेठा, व्यापारी यांच्याकडे जाऊन बदनामीची धमकी देत पैसे वसूल करतात. काही जण तर अक्षरश: टोळीप्रमाणे काम करतात. अशा बोगस खंडणीखोर पत्रकारांची तातडीने तक्रार करण्याचे आवाहन पोलीस विभागो केले आहे.

Web Title: Lawyer beaten and threatened fake journalist Munna Patel arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर