‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:54+5:302021-05-27T04:08:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : जलालखेडा येथे ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. देवग्राम येथील जीवन ...

‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : जलालखेडा येथे ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. देवग्राम येथील जीवन विकास महाविद्यालय, जलालखेडा पोलीस स्थानक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सात दिवस ही मोहीम राबवली जाणार असून, जलालखेडा, देवग्राम, मदना, मेंढला, मुक्तापूर पेठ, नांदणी, चांदणी बर्डी, नारसिंगी, भारसिंगी, दातेवाडी, वडविहरा, खरबडी, जुनोना, बोपापूर व इतर काही गावांमधील ४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अजूनपर्यंत लस न घेतलेल्या ६० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासन लसीकरणाची मोहीम राबवत असले तरी ग्रामीण भागात जनजागृतीच्या अभावामुळे अनेक ग्रामस्थांनी अद्यापही लसीकरण करुन घेतलेले नाही. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. दिनांक २२ ते २८ मेच्या दरम्यान ही मोहीम जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी नरखेड तालुक्यातील स्वयंसेवकांची बैठक घेऊन नियोजन केले आहे.