महिनाभरापासून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:46+5:302021-02-13T04:08:46+5:30

नागपूर : जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळण्यासाठी मेडिकलने नेत्ररोग विभागासाठी चार कोटी रुपयांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘लॅसिक लेझर’ उपकरण खरेदी ...

LASIK laser surgery stalled for over a month | महिनाभरापासून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया ठप्प

महिनाभरापासून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया ठप्प

नागपूर : जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळण्यासाठी मेडिकलने नेत्ररोग विभागासाठी चार कोटी रुपयांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘लॅसिक लेझर’ उपकरण खरेदी केले. या यंत्राच्या मदतीने माजी तत्कालीन विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी लॅसिक लेझर शस्त्रक्रियेने जवळपास २५०० युवक-युवतींच्या चष्म्याला कायमचा निरोप दिला. परंतु डॉ. मदान यांच्या निवृत्तीनंतर दुसऱ्या तज्ज्ञाची नेमणूक न केल्याने महिनाभरापासून शस्त्रक्रियाच ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे तीन फेको यंत्रही बंद पडल्याने नेत्ररोग विभागालाच ‘नजर’ लागल्याचे बोलले जात आहे.

लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधूक दिसत असेल, जाड चष्म्याच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल तर अशा सर्वांवर अत्याधुनिक ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते. यासाठी विभागप्रमुख असताना डॉ. मदान यांनी पुढाकार घेतला. सतत पाठपुरावा करून हे यंत्र विभागात स्थापन केले. यात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे मोठे सहकार्य लाभले. राज्यात हे उपकरण मुंबईच्या जे.जे. रुग्णालयानंतर नागपूरच्या मेडिकलमध्ये आहे. मागील दोन वर्षांत या उपकरणाच्या मदतीने २५०० वर युवक-युवतींवर लॅसिक लेझरची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुसह्य केले. यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गर्दी वाढली होती. परंतु डॉ. मदान यांची मागील महिन्यात निवृत्ती झाल्यानंतर तज्ज्ञाअभावी या शस्त्रक्रियाच बंद पडल्याने रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे.

- काय आहे ‘लॅसिक लेझर’

रुग्णाला कुठलेही इंजेक्शन किंवा चिरा न देता ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रिया केली जाते. वेदनारहित ही १०० टक्के यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ज्या उपकरणाच्या मदतीने ही शस्त्रक्रिया केली जाते त्याला ‘लेझर इन सीतू केरॅटोमीलेयुसीस’ असेही म्हटले जाते. डोळ्याच्या बुबुळाच्या मध्यभागातील जाडी साधारण ‘.५’ मिलिमीटर वाढलेली असल्यास त्यात एक नंबर कमी करण्यासाठी १०-१२ मायक्रॉनपर्यंत ही जाडी ‘लेझर’द्वारे कमी करून चष्म्यापासून पूर्णत: मुक्ती दिली जाते. अर्ध्या तासाच्या या शस्त्रक्रियेमुळे आतापर्यंत अनेकांचे जीवन सुसह्य केले आहे.

-तीन फेको यंत्रही बंद

२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फेको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. नागपूर मेडिकलला सुरूवातीला एक आणि नंतर दोन यंत्रे मिळाली. सध्या जुने यंत्र कालबाह्य झाले असून दोन यंत्र नादुरुस्त होऊन महिन्याभरापासून बंद पडली आहेत. परिणामी, गरजू रुग्णांवर जुन्या पद्धतीने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.

Web Title: LASIK laser surgery stalled for over a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.