'लस महोत्सव'; पहिल्याच दिवशी फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:33+5:302021-04-12T04:07:33+5:30
नागपुरात लसीचा तुटवडा : शहरातील बहुसंख्य लसीकरण केंद्र बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ११ एप्रिलला महात्मा जोतिबा ...

'लस महोत्सव'; पहिल्याच दिवशी फज्जा
नागपुरात लसीचा तुटवडा : शहरातील बहुसंख्य लसीकरण केंद्र बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११ एप्रिलला महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीपासून देशभरात 'लस महोत्सव' सुरू झाला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र नागपुरात पहिल्याच दिवशी रविवारी लस उत्सवाचा फज्जा उडाला. शहरात दररोज १४,५०० लाभार्थींना लसीकरण होते. परंतु रविवारी फक्त ६,६०५ लोकांना लस देण्यात आली. बहुसंख्य लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना परत यावे लागले.
लसींचा तुटवडा असल्याने मेडिकलमधील लसीकरण केंद्र ३६ तास बंद होते. कोव्हॅक्सिनचे १५०० डोस देण्यात आले. लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने येथे फक्त दुसरा डोस दिला जात आहे. हा साठा एक-दोन दिवसांत संपणार आहे. कोव्हॅक्सिनचे शहरातील पाचही केंद्र बंद होते. काही केंद्रावर कोविशिल्डच्या लसी उपलब्ध केल्यावर लसीकरण सुरू झाले होते, परंतु रविवारी शहरातील बहुसंख्य लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. काही ठिकाणी लस नसल्याने नागरिक लसीसाठी रांगेत लागले. केंद्रावर लस नसल्याची माहिती दिली जात नव्हती. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला.
महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात नागरिक सकाळी लसीकरणासाठी आले. परंतु येथे लस उपलब्ध नसल्याचा फलक लावण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये ९ लसीकरण केंद्रापैकी सहा केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. यामुळे क्रीडा संकूल बॅडमिंटन हॉल, स्केटिंग हॉल गायत्रीनगर, महात्मा गांधी समाज भवन, मनपा शाळा शिवनगाव, श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवननगर यांसह अन्य केंद्रांवर लस नव्हती.
नेहरूनगर झोनमधील शीतला माता मंदिर, शिवमंदिर समाजभवन, कामगार कल्यास कार्यालय, इंदिरा गांधी समाजभवन, ताजबाग हेल्थ पोस्ट आदी केंद्रांवर लस नव्हती. के.डी.के. आयुर्वेदिक हॉस्पिटल केंद्रावर मर्यादित ३० डोस होते. ते लवकरच संपले. दर्शन कॉलनी केंद्रावरही ३० डोस होते. ते काही वेळात संपले. त्यानंतर लसीकरण बंद करण्यात आले. हनुमानगर झोनमधील म्हाळगीनगर शाळा, जानकीनगर, दुर्गानगर शाळा यांसह अन्य केंद्रांवर लस साठा संपला होता. धंतोली, गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, सतरंजीपुरा, आसीनगर या झोनमधील केंद्रावर अशीच परिस्थिती होती.
...