जमिनीच्या मालकी हक्काची याचिका फेटाळली
By Admin | Updated: July 1, 2015 03:02 IST2015-07-01T03:02:32+5:302015-07-01T03:02:32+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाडी जवळच्या दवलामेटी येथील जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे.

जमिनीच्या मालकी हक्काची याचिका फेटाळली
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाडी जवळच्या दवलामेटी येथील जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. याचिकेतील दाव्यात काहीच गुणवत्ता नसल्याचा निष्क र्ष निर्णयात नोंदविण्यात आला आहे.
न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी हा निर्णय दिला आहे. प्रकाश वाटकर यांच्यासह दहाजणांनी ही याचिका दाखल केली होती. सर्वे क्र. २१/३ येथील ६६०० चौरस मीटर जमिनीचे हे प्रकरण होते. ही जमीन २० सप्टेंबर १९९० पासून राज्य शासनाच्या ताब्यात होती. शासनाने नागरी जमीन कायद्याच्या कलम १०(५) अंतर्गत जारी केलेली नोटीस अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयाने खारीज केला. या नोटीसद्वारे मालकांना १७ आॅगस्ट १९९० रोजी जमिनीवर उपस्थित राहून शासनाला जमिनीचा ताबा देण्याचे निर्देश देण्यात आले होते. निर्देशाचे पालन झाले नाही. यामुळे शासनाने जमिनीचा ताबा घेतला. ही कारवाई न्यायालयाने योग्य ठरविली आहे.
शासनाने अवैधरीत्या जमिनीचा ताबा घेतल्याचे म्हणणे होते तर यासंदर्भात वेळेत तक्रार करायला हवी होती. याचिकाकर्त्यांकडून २० सप्टेंबर १९९० रोजी जमिनीचा ताबा काढून घेण्यात आला. याविरुद्ध त्यांनी ७ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली, असे न्यायालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)