भूमाफिया धापोडकरने तहसीलदारांचीही केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:50+5:302021-05-30T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात भूमाफिया संजय धापोडकर आणि त्याच्या साथीदारांच्या पापाची जंत्री पोलिसांनी जमविली आहे. ...

Land mafia Dhapodkar also cheated tehsildars | भूमाफिया धापोडकरने तहसीलदारांचीही केली फसवणूक

भूमाफिया धापोडकरने तहसीलदारांचीही केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात भूमाफिया संजय धापोडकर आणि त्याच्या साथीदारांच्या पापाची जंत्री पोलिसांनी जमविली आहे. चौकशीत धापोडकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी तहसीलदारांचीही फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे धापोडकर टोळीविरुद्ध पुन्हा नवे गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

गँगस्टर रंजित सफेलकरसोबत हातमिळवणी करून एका शेतकऱ्याचे अपहरण केल्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन धापोडकरने १६ एकर जमीन हडपली आणि त्यावर अनधिकृत लेआउट टाकून शेकडो जणांना भूखंड विकले. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी धापोडकरला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अनेक जण तक्रारीसाठी पुढे आले आहेत. दरम्यान, धापोडकरने आपल्या साथीदाराच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची मान्यता मिळवण्यासाठी ठिकठिकाणच्या तहसीलदारांचीही दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा पोलीस करीत आहेत. त्याच्यासंबंधाने आलेल्या तक्रारींचीही शहानिशा पोलीस करत असून, लवकरच धापोडकरविरुद्ध नवे गुन्हे दाखल होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

---

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ

धापोडकर सध्या कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून धापोडकरचे साथीदार प्रयत्नशील आहेत. ते संभाव्य तक्रारदारांना धमक्या देऊन आणि आमिष दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘लोकमत’ने आज यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली.

---

Web Title: Land mafia Dhapodkar also cheated tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.