उपराजधानीतील भूमाफिया बेलगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:54+5:302021-01-13T04:17:54+5:30
वेसण घालण्याची प्रक्रिया सुरू गृहमंत्र्यांचे तातडीने कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - उपराजधानीतील भूमाफिया बेलगाम झाले ...

उपराजधानीतील भूमाफिया बेलगाम
वेसण घालण्याची प्रक्रिया सुरू
गृहमंत्र्यांचे तातडीने कारवाईचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उपराजधानीतील भूमाफिया बेलगाम झाले आहेत. प्लॉट, जमिनी हडपण्यासोबतच त्यांनी अकृषक जमिनीवर प्लॉट पाडून त्याची विक्री करीत अनेकांची आयुष्यभराची कमाई हडपली आहे. दुसऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करून कोट्यवधींची खंडणी वसुलण्याचीही अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. भूमाफिया, जमीन बळकावणे, या विषयाच्या अनुषंगाने पोलीस जिमखान्यात आज तक्रार निवारण शिबिर पार पडले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या शिबिरात पोलीस, महसूल आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पीडितांच्या तक्रारी तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
नागपुरात प्लॉट, जमिनी हडपण्याच्या प्रकरणात अचानक वाढ झाली असून, संबंधित विभाग तसेच पोलिसांना हाताशी धरून पीडितांची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यासंबंधाने आजच्या तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ७५ प्रकरणे ऐकून घेतली. त्यानुसार, वाठोडा भागात एका बिल्डरने एनए न करताच प्लॉटची विक्री केली. या प्लॉटवर घर बांधण्यात अडचण येत आहे आणि हा प्लॉट विकताही येत नाही, अशी तक्रार ममता गुमगावकर यांनी केली. गुमगावकरसारख्याच पाच तक्रारी शिबिरात आल्या. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी अशा बिल्डर व प्रॉपर्टी डीलरची यादी तयार करण्याचे आयुक्तांना सांगितले. ईश्वर धीरडे व अन्य पीडितांनी बहादुरा भागात १९ प्लॉट घेतले. नंतर बिल्डरने हेच प्लॉट परस्पर दुसऱ्या ग्राहकांना विकल्याची तक्रार केली. गंगाधर नाकाडे यांनी २०११ मध्ये नंदनवनमध्ये प्लॉट खरेदी केला. या प्लॉटवर एका राजकीय नेत्याच्या साथीदारांनी इमारत बांधली. बिल्डर प्लॉटही देत नाही आणि पैसेही परत करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. चंदा कानफाडे यांच्या जरीपटक्यातील प्लॉटवरही असाच प्रकार घडला. वनिता घोरमाडे व अन्य पाच महिलांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार मांडताना फेटरी परिसरातील प्लॉट बिल्डरसोबत खरेदीचा व्यवहार केला. मात्र बिल्डरने रजिस्ट्री करून दिली नसल्याचे म्हटले. बिल्डर पैसेही परत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राजनाथ पांडे यांनीही बिल्डरने प्लॉटची रजिस्ट्री करून दिली नसल्याचे सांगितले. याशिवाय अशाच अनेक तक्रारी आल्या. काहींनी थेट भूमापन अधिकाऱ्यांवरही आरोप लावले. त्यातील तथ्य लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी करून बोगस नामांतरण केल्याचे उघड झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. या शिबिरात बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी, भूमापन, कृषी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---
गोरेवाड्यातील १३ एकर जमिनीवर कब्जा
सलीम बेग यांची गोरेवाडा भागातील १३ एकर जमीन बळकावण्यात आली. एका गुंडाने बनावट दस्तऐवजाद्वारे या जमिनीवर ताबा घेतल्याचे पुढे आले आहे.
---