गोंधळातच प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप
By Admin | Updated: January 13, 2017 02:08 IST2017-01-13T02:08:07+5:302017-01-13T02:08:07+5:30
शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना तिसऱ्या टप्प्यात गुरुवारी गोंधळातच भूखंड वाटप करण्यात आले.

गोंधळातच प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप
नागपूर : शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना तिसऱ्या टप्प्यात गुरुवारी गोंधळातच भूखंड वाटप करण्यात आले. प्रारंभी आठ जणांना भूखंड नाकारल्यानंतर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी भूखंडाची कागदपत्रे स्वीकारली.
बिगर शेतकरी वर्गवारीतील ८१ प्रकल्पग्रस्तांना दोन हजार आणि २९ जणांना अडीच हजार चौरस फूट आकाराच्या चिचभुवन येथील भूखंडाची कागदपत्रे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहानमधील मध्यवर्ती इमारतीतील सभागृहात देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या यादीनुसार गुरुवारी ११८ जणांना भूखंड वाटप करण्यात येणार होते. पण काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे सहा जणांना दोन हजार चौरस फूट आणि दोन जणांना अडीच हजार चौरस फूट आकाराचे भूखंड नाकारण्यात आले.
दोन टप्प्यात १५७ प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाकारले
यापूर्वी एक हजार चौरस फूट आकाराचे भूखंड वाटप करताना ९३ प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले होते.
यादीत २४९ जणांची नावे होती. पण प्रत्यक्षात १८० जणांना बोलविण्यात आले आणि त्यातील १५६ जणांना भूखंडाची कागदपत्रे देण्यात आली. याशिवाय ७ जानेवारीला १५०० चौरस फूट भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ४२१ जणांची नावे यादीत होती. प्रत्यक्षात ६५ जणांना वगळून ३५६ जणांना भूखंडाची कागदपत्रे देण्यात आली.
दोन टप्प्यात झालेल्या वाटपात १५७ प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाकारल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. तिसऱ्या टप्प्यातही दावेदार प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळणार वा नाही, अशी भीती त्यांच्यात होती. त्यामुळेच प्रारंभी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी वर्गात तीन हजार आणि त्यावरील चौरस फूट आकाराच्या भूखंडाची कागदपत्रे २० जानेवारीला सोपविण्यात येणार आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी व एमएडीसीचे पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी पांडे, तहसीलदार (शहर) व भूसंपादन अधिकारी बोरकर आणि एमएडीसीचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)