भूसंपादन केले अन् मोबदलाही परत घेतला
By Admin | Updated: June 30, 2015 03:10 IST2015-06-30T03:10:36+5:302015-06-30T03:10:36+5:30
‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व

भूसंपादन केले अन् मोबदलाही परत घेतला
नासुप्रने न्याय द्यावा : भूखंड परत
मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचा संघर्ष
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व २५ /५२ येथील भूखंड क्रमांक १, २ व ३ संपादित करण्यात आले. मात्र, संबंधित जागेवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधल्याच्या कारणावरून नासुप्रने संबंधित भूखंड नियमित केलेले नाहीत. आपले भूखंड परत मिळविण्यासाठी धरमपेठच्या डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक डंभारे नासुप्रच्या चकरा मारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाधान शिबिरातही त्यांनी दाद मागितली. मात्र, नासुप्रकडून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
नासुप्रचे म्हणणे आहे की सध्या या भूखंडांवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधली आहे व ही जमीन सध्या बुद्धविहाराच्या ताब्यात आहे. महापालिकेने या जागेवर भिंतीचे बांधकाम केले असल्यामुळे संबंधित भूखंड आता नियमित होऊ शकत नाही, असे नासुप्रचे म्हणणे आहे. महापालिकेच्या संरक्षण भिंतीमुळे संबंधित भूखंडांचे नियमितीकरण होऊ शकले नाही. मात्र, भूखंड नियमित करण्यास महापालिकेने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. उलट याबाबतचे सर्व अधिकार नासुप्रला दिलेले आहेत. डंभारे यांनी संबंधित भिंत तोडण्यासाठी महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे नोव्हेंबर २०११ मध्ये विनंती अर्ज केला होता. त्यावार महापालिकेने या जागेचा ताबा नासुप्रकडे असल्याचे सांगत त्यांनी आपल्या स्तरावर तोडगा काढावा, मनपातर्फे काहीही हरकत राहणार नाही, असा अभिप्राय दिला होता. यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी नासुप्रने टाकळी सीम बुद्धविहार कमिटीला वरील जागेचे मालकी हक्काबाबतचे पंजीबद्ध दस्तावेज सादर करण्यासाठी पत्राद्वारे कळविले. मात्र, बुद्धविहार कमिटीने अद्याप दस्तावेज सादर केलेले नाहीत. मात्र, यानंतरही नासुप्र संबंधित भूखंडांवर निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. नासुप्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यावेळी संबंधित भूखंड संपादित करण्यात आले. त्यामुळे संबंधित भूखंड ‘सी. एम. फाम्युर्ला’ अंतर्गत नियमित करून देण्यासाठी नासुप्रने १६ फेब्रुवारी १९८४ रोजी डंभारे यांना पत्र दिले. या पत्रातील अटीप्रमाणे डंभारे यांनी अवॉर्डवर स्वाक्षरी केली व भूखंडाचा ताबा नासुप्रला दिला. सोबतच मिळालेली मोबदल्याची रक्कमही नासुप्रमध्ये जमा करण्यात आली. त्याची पावतीही देण्यात आली. सद्यस्थितीत डंभारे यांच्या हातून त्यांचे तिन्ही भूखंडही गेले आहेत व या भूखंडांचा मिळालेला मोबदलाही गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भूखंड परत मिळविण्यासाठी डंभारे यांचा संघर्ष सुरू आहे. मात्र, नासुप्रची यंत्रणा त्यांचे ‘समाधान’करण्यात पुढाकार घेताना दिसत नाही.