चार वर्षांत बांधणार लाखावर शौचालय
By Admin | Updated: July 7, 2015 02:33 IST2015-07-07T02:33:42+5:302015-07-07T02:33:42+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याला २०१४-१५ या वर्षात १६,२०८ वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते

चार वर्षांत बांधणार लाखावर शौचालय
स्वच्छ भारत मिशन : स्वच्छता मिशन विभागाचा संकल्प
गणेश हूड नागपूर
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याला २०१४-१५ या वर्षात १६,२०८ वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८,६८२ शौचालयांचे बांधकाम करून विभागात चांगली कामगिरी केली. पुढील चार वर्षात १,१५,४२३ शौचालयांचे बांधकाम करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागाने केला आहे.
वार्षिक कृती आराखड्यानुसार वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी पूर्ण केले. इतकेच नव्हे तर पुढील वर्षाच्या उद्दिष्टांपैकी ३० जूनपर्यंत सहा हजाराहून अधिक शौचालयांची कामे करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात २०१४ सालापासून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. परंतु लाभार्थीला बांधकाम के ल्यानंतर शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेतील लाभार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना ही रक्कम खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरुवातीला या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
ही बाब विचारात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी लाभार्थींना बांधकामापूर्वी अनुदानाचा पहिला हप्ता देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यात मिशनने चांगलीच गती घेतली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १८०२ शौचालयांचे बांधकाम अधिक करण्यात यश आले आहे. जोंधळे यांच्या मार्गदर्शनात पुढील वर्षातही उद्दिष्टाहून अधिक शौचालयांचे बांधकाम होईल असा विश्वास विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लाखाहून अधिक शौचालय उभारणार
केंद्र सरकारने हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी माहिती, शिक्षण व संवादाच्या उपक्रमाद्वारे जिल्ह्यात प्रचार व प्रसार क रण्यात आला. परंतु लोकांची आर्थिक अडचण विचारात घेता अगाऊ अनुदानाचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. याला चांगला प्रतिसाद मिळाला २०१९ सालापर्यंत जिल्ह्यात १,१५,४२३ शौचालयाचे बांधकाम होण्यात कोणतीही अडचण जाणार नाही.
शिवाजी जोंधळे
मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.