सिलिंडरचा तुटवडा, ग्राहक गॅसवर

By Admin | Updated: September 5, 2014 01:11 IST2014-09-05T01:11:52+5:302014-09-05T01:11:52+5:30

सार्वजनिक भोजनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या काळात नेमका घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नागरिकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदीची वेळ आली आहे.

Lack of cylinders, consumer gas | सिलिंडरचा तुटवडा, ग्राहक गॅसवर

सिलिंडरचा तुटवडा, ग्राहक गॅसवर

एजन्सीपुढे रांगा : सिलिंडर हजारावर!
नागपूर : सार्वजनिक भोजनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या काळात नेमका घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नागरिकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदीची वेळ आली आहे. काळ्याबाजारात सिलिंडरच्या किमतीत हजारावर पोहोचल्याने महागाईची खरी झळ आता बसत असल्याची नागरिकांची ओरड आहे.
सर्वच कंपन्यांच्या एजन्सीपुढे ग्राहकांच्या रांगा असून अधिकाऱ्यांनी नेहमीचे कारण पुढे करून ग्राहकांना वाऱ्यावर सोडून एजन्सीची बाजू मांडत आहे. ‘बुरे दिन की शुरुवात’ अशी नागरिकांची ओरड आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता वर्धमाननगर येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एजन्सीसमोर १०० पेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होती. यासंदर्भात प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
सिलिंडरचा अपुरा पुरवठा
कंपनीच्या तांत्रिक अडचणीशी ग्राहकांना काही घेणे-देणे नाही. सिलिंडर सुरळीत मिळणे, हा नागरिकांचा हक्क आहे. आमचा हक्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि एजन्सी हिरावून नेत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून महिलावर्ग वैतागला आहे. ओळखी काढून सिलिंडर मिळावे म्हणून ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्याला नियंत्रण बसायला हवे, असे मत काही ग्राहकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. भारत, एचपी व इण्डेन गॅस कंपन्यांकडे हजारो सिलिंडरची बुकिंग पेंडिंग आहेत. पुरेसा लोड (एक ट्रक ३०६ सिलिंडर) येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले. लोकांच्या अडचणीची दखल एजन्सीकडूनही घेतली जात नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे. दुसरीकडे अनेक टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे.
टंचाई कधी दूर होणार?
तांत्रिक कारणांमुळे घरगुती सिलिंडरची टंचाई आहे, यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करताना टंचाई लवकरच दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. बल्कचा पुरवठा कमी असल्याने सिलिंडरचे रिफिलिंग होत नाही. वितरकांकडे लोड उपलब्ध होत आहेत, पण मागणी वाढल्याने टंचाई जाणवत आहे. स्थिती सामान्य करण्याचे वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले.

Web Title: Lack of cylinders, consumer gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.