कष्टकरी महिलांनी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे
By Admin | Updated: February 10, 2015 00:49 IST2015-02-10T00:49:44+5:302015-02-10T00:49:44+5:30
पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही,

कष्टकरी महिलांनी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे
पेन्शन परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन
नागपूर : पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढावी लागले. तेव्हा पेन्शनसाठी कष्टकरी कामगार महिलांनी रस्त्यावर उतरण्यास तयार राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी आणि असुरक्षित कष्टकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. बाबा आढाव यांनी येथे केले.
विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे सोमवारी सर्वोदय आश्रम विनोबा विचार केंद्र धरमपेठ येथे ‘घरेलु कामगारांची पेन्शन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी होत्या. तर सामाजिक कृतज्ञता निधी पुणेचे कार्यवाह प्रा. सुभाष वारे, शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, आमदार आणि खासदार एकदा निवडून आले की, त्यांना जीवनभरासाठी पेन्शन दिली जाते. तेव्हा कष्टकरी महिलांना का नाही. त्यांनाही म्हातारपणात पेन्शन मिळावी, ही मागणी काही केवळ नागपूर किंवा विदर्भातील मोलकरणींचीच नाही, तर समस्त कष्टकरी महिलांची आहे. त्यामुळे कष्टकरी महिलांना पेन्शन मिळण्यासाठी देशव्यापी लढा लढण्याची गरज आहे, या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पेन्शन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तिथे लढाईची रूपरेषा सुद्धा ठरविली जाईल. या मागणीसाठी आपण दिल्लीला धरणे दिले तेव्हा सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याला भेटायला आले होते. तुमच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. आमचे सरकार सत्तेवर येताच कष्टकऱ्यांना पेन्शन लागू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. तेव्हा आता त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. त्यांना निवेदने द्या आणि केव्हापर्यंत पेन्शन लागू करता, याचा जाब विचारा. पेन्शन लागू झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्यास तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुभाष वारे म्हणाले, मोलकरणींसह ऊस तोड कामगार महिला आणि कोकणात मासेमारीमध्ये सहभागी असलेल्या कष्टकरी महिलांनासुद्धा पेन्शन मिळण्याची गरज आहे. ही लढाई लढत असतानाच विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी यांनीही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मोलकरणींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या भाग्यश्री ढगे, श्वेता मोटघरे आणि वंदना माटे या महिला कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला.
विदर्भ मोलकरीण संघटनेचे सचिव विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता भोंगाडे यांनी संचालन केले. भाग्यश्री ढगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घेणार अधिवेशन
मोलकरणींना पेन्शन मिळावी या मागणीसाठी आता लढा सुरू झाला आहे. यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोरील मोकळ्या मैदानावर मोलकरणींचे अधिवेशन घेण्यात येईल. पोलिसांनी परवानगी न दिल्यास ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे दिला.