केव्हीआयसीच्या अधिकाऱ्यास कारावास
By Admin | Updated: July 11, 2014 01:16 IST2014-07-11T01:16:34+5:302014-07-11T01:16:34+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावरील आठ हजाराच्या लाचप्रकरणी सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सहायक विकास अधिकारी

केव्हीआयसीच्या अधिकाऱ्यास कारावास
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील आठ हजाराच्या लाचप्रकरणी सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सहायक विकास अधिकारी प्रकाश विठ्ठलराव चौदलवार यांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सीबीआयच्या पथकाने सापळा रचून १३ फेब्रुवारी २००८ रोजी नागपूर रेल्वेस्थानकावर भंडाऱ्याच्या तिरोडा येथे राहणाऱ्या या अधिकाऱ्याला लाखनी येथील रहिवासी डॉ. दीपराज इलमकर यांच्याकडून आठ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली होती.
या सापळ्याची पार्श्वभूमी अशी की, केंद्र सरकारने २००७ मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोग संचालनालयाच्या अंतर्गत ‘ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम’ ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत इलमकर यांना लाखनी येथे राईस मिल उभारायची होती. या योजनेंतर्गत सरकार २५ लाखांच्या प्रकल्पापर्यंत बँक आॅफ इंडियाच्यामार्फत कर्ज मंजूर करीत होती. एकूण प्रकल्प खर्चात ९५ टक्के अर्थसाहाय्याचावाटा बँकेचा तर ५ टक्के वाटा खुद्द प्रकल्पधारकाचा होता. लाभार्थ्याला ४ लाख ५० हजाराचे अनुदान खादी व ग्रामोद्योग आयोग देत होते. यानुसार इलमकर यांनी या आयोगाच्या नागपूर येथील कार्यालयात अर्ज केला होता. परंतु येथील अधिकारी त्यांना कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी लाखनी शाखेच्या बँक आॅफ इंडियात अर्ज केला होता. बँकेने याबाबत आयोगाकडे विचारणा केली होती. उपसंचालकाने अटींची पूर्तता केल्यास स्वयंरोजगारासाठी असे कर्ज देता येते, असे कळवले होते. या कामासाठी उपसंचालक हेडाऊ यांना नेमण्यात आले होते.
प्रकाश चौदलवार यांना इलमकर यांच्या प्रकल्पाचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी ३ फेब्रुवारी २००८ रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली होती. निरीक्षण केल्यानंतर त्यांनी अनुदानासाठी नऊ हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
पुढे सौदेबाजी होऊन आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु डॉ. इलमकर यांना लाच द्यायची नसल्याने, त्यांनी सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती.
लाच नागपूर रेल्वेस्थानकावर देण्याचे ठरले होते. सापळ्याच्या दिवशी चौदलवार हे गोंदियाहून गीतांजली एक्स्प्रेसने आले होते. इलमकर यांनी दिलेली आठ हजाराची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आली होती.
सीबीआयने तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. लाचेचा सापळा सिद्ध होताच, न्यायालयाने आरोपी चौदलवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तीन वर्षे कारावास, दोन हजार रुपये दंड, कलम १३ (२), १३ (१)(ड)अंतर्गत दोन वर्षे कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील अग्रवाल तर आरोपीच्या वतीने अॅड. शेंडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)