कुहीत भाजपला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:24+5:302021-01-19T04:10:24+5:30
प्रदीप घुमडवार लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने १४ ग्रामपंचायतींवर बहुमत सिद्ध करीत दावा केला ...

कुहीत भाजपला बहुमत
प्रदीप घुमडवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने १४ ग्रामपंचायतींवर बहुमत सिद्ध करीत दावा केला आहे. कुठे महाविकास आघाडीच्या पॅनलखाली तर कुठे स्वतंत्र लढत काँग्रेसने ७ ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा केला आहे. राष्ट्रवादीनेही निवडणुकीत असाच पवित्रा घेत ३ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.
तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या हाेत्या. मतदार याद्यांमधील घाेळामुळे देवळी(कला) येथील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सोमवारी तहसील कार्यालयात तहसीलदार बाबाराव तीनघसे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वामन पाचबुधे यांच्या देखरेखीत २४ ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. २४ पैकी १४ ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता स्थापन करणारे बहुमत मिळविल्याचा दावा केला आहे. उर्वरित १० ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दावा केला असला तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे.
२४ ग्रामपंचायतीमध्ये २०८ सदस्यांपैकी ९७ सदस्य आमचे निवडून आले, असा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, भाजपने तालुक्यात विजयी रॅली काढून जल्लोष केला. रॅलीत माजी आमदार सुधीर पारवे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी सोनसरे, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला दंडारे, बाळू ठवकर, पंचायत समिती उपसभापती वामन श्रीरामे, पंचायत समिती सदस्य वैशाली भुजाडे, सरपंच लाला दंडारे, हुकुमचंद लांबाडे उपस्थित होते. काँग्रेसतर्फेसुद्धा दावा केलेल्या ग्राम पंचायतीमध्ये विजयी रॅली काढण्यात आली. यात कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळचे सभापती मनोज तितरमारे सहभागी झाले होते.
....
पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायती
भारतीय जनता पक्षाने भटरा, चापेगडी, कुजबा, साळवा, बानोर, पारडी, तारणा, वेळगाव, वीरखंडी, डोडमा, मुसळगाव, ससेगाव, वडेगाव (काळे), खोकर्ला व किन्ही या ग्रामपंचायतींवर दावा केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने राजोली, कऱ्हांडला व हरदोली तसेच काँग्रेसने परसोडी (राजा), बोरी (नाईक), म्हसली, राजोला, बानोर, चितापूर, हरदोली (नाईक) या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.