कृष्णा इंगळे हे कर्मचाऱ्यांसाठी झटणारे समर्पित नेतृत्व
By Admin | Updated: November 9, 2014 00:47 IST2014-11-09T00:47:45+5:302014-11-09T00:47:45+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुखदु:खात सामील असलेले, त्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडणारे आणि त्या सोडविण्यासाठी समर्पितपणे झटणारे नेते म्हणजे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे

कृष्णा इंगळे हे कर्मचाऱ्यांसाठी झटणारे समर्पित नेतृत्व
अभीष्टचिंतन सोहळा : वक्त्यांचे गौरवोद्गार
नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुखदु:खात सामील असलेले, त्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडणारे आणि त्या सोडविण्यासाठी समर्पितपणे झटणारे नेते म्हणजे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे होत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कास्ट्राईब कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उपरोक्त शब्दांत त्यांचा गौरव केला.
अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे होते. आॅफिसर्स फोरमचे पदाधिकारी शिवदास वासे, माहिती संचालक मोहन राठोड, समाज कल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, माजी उपजिल्हाधिकारी रामभाऊ आंबुलकर, माजी शिक्षणाधिकारी निर्गुनश: ठमके प्रमुख अतिथी होते.
याप्रसंगी बोलताना धर्मेश फुसाटे म्हणाले कृष्णा इंगळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. शासनदरबारी त्यांचा दबदबा आहे. कर्मचाऱ्यांच्या विरोधात असलेले अनेक जी.आर. त्यांनी बदलवून आणले. १९८० च्या काळात कास्ट्राईबकडे बेरोजगारंचे नाव नोंदणीचे काम देण्यात आले होते. त्यात मी सुद्धा नाव नोंदणी केली. तेव्हा नागपुरातून किमात ५ ते ६ हजार बेरोजगारांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच हजार लोकांना नोकरी लागल्याची आठवणसुद्धा त्यांनी यावेळी सांगितली.
शिवदास वासे म्हणाले, कुठलीही संघटना बांधणे अतिशय कठीण आहे. कृष्णा इंगळे यांनी कर्मचाऱ्यांची संघटना अतिशय शिस्तबद्धपणे बांधली आहे. इतकेच नव्हे तर या संघटनेची शासनदरबारी दखल घेतली जाते इतकी ती सक्षम आहे. येणारा काळ हा अतिशय कठीण असून ही संघटना आणखी मजबूत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोहन राठोड म्हणाले, इंगळे यांना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समस्यांची जाणीव आहे. शासकीय जी.आर. तर त्यांना तोंडपाठ आहेत. कर्मचाऱ्यांची कामे ते समर्पितपणे करतात, हा त्यांच्यातील मुख्य गुण आहे. सिद्धार्थ गायकवाड, निर्गुनश: ठमके यांनीही इंगळे यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सात ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांनीसुद्धा आपल्या प्रतिनिधी मार्फत पुष्पगुच्छ पाठवून स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवखेडा हत्याकांडातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संचालन सोहन चवरे यांनी केले. बाळासाहेब बनसोड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांमध्ये अदृश्य जातीभेद
जातीभेद हा दोन प्रकारचा असतो. एक दृश्य आणि एक अदृश्य. शासकीय कार्यालयात काम करीत असताना अदृश्य स्वरूपाचा जातीभेद पाळला जातो, अशी खंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. चळवळीचे बाळकडू आपल्याला घरातूनच मिळाले. ४० वर्षापासून आपण चळवळीत आहो. कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. काही कटू अनुभव सुद्धा आलेत. परंतु त्याची फिकीर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आपले जन्मगाव आणि समाजासाठी काम करा, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.
कर्मचाऱ्यांचाही प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवा
शिक्षक, पदवीधर या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी सुद्धा विधान परिषदेत पाठविण्यात यावा. गेल्या ४० वर्षांपासून कर्मचाऱ्यांसाठी झटत असलेले कृष्णा इंगळे हे यासाठी अगदी योग्य आहेत, तेव्हा त्यांनाच कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी सर्वानुमते करण्यात आली.