वीज केंद्रातील राखेमुळे अडकले कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:45+5:302021-04-30T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना रुग्णांसाठी बेडचा तुटवडा दूर करण्याच्या उद्देशाने कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कोविड ...

वीज केंद्रातील राखेमुळे अडकले कोविड रुग्णालय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांसाठी बेडचा तुटवडा दूर करण्याच्या उद्देशाने कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कोविड रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न होते. तज्ज्ञांनी यासंदर्भात सादर केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास अडचण असते. वीज केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर राख निघते. त्यामुळे अशा ठिकाणी रुग्णालय असणे योग्य होणार नाही. तज्ज्ञांनी आपला अहवाल सादर केला आहे, मात्र यावर अंतिम निर्णय प्रशासनालाच घ्यायचा आहे.
कोराडी व खापरखेडा वीज केंद्रात ऑक्सिजनची उपलब्धता लक्षात घेऊन येथे कोविड रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव निर्णयार्थ होता. मात्र यासाठी गठित तज्ज्ञांच्या चमूने मात्र या प्रस्तावाला सहमती दर्शविली नाही. या चमूचे मानणे आहे की, वीज केंद्र परिसरातील कोळशापासून निघालेली राख मोठ्या प्रमाणावर आहे. ही राख रुग्णालयासाठी योग्य होणार नाही. या चमूने दोन्ही वीज केंद्रांची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. समितीचे म्हणणे आहे की, ऑक्सिजनचे उत्पादन मात्र येथे निश्चित केले जाऊ शकते. येथून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा उपयोग रुग्णालयासाठी निश्चित करता येऊ शकतो.
बॉक्स
चीनवरून आणावा लागेल कॉम्प्रेसर
वीज केंद्रात ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी तीन मोठ्या कॉम्प्रेसरची आवश्यकता आहे. सध्या येथे केवळ एकच कॉम्प्रेसर उपलब्ध आहे. उर्वरित दोन कॉम्प्रेसर चीनवरून मागवावे लागतील. या संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.