नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:29 AM2020-07-29T11:29:58+5:302020-07-29T11:31:45+5:30

प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.

Kovid Health Center in Nagpur could not find a doctors! | नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

Next
ठळक मुद्दे मनपा प्रशासन हतबल पाच सज्ज रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे गृहीत धरून महापालिका प्रशासनाने पाच रुग्णालये अत्याधुनिक केली. ४५० खाटांसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन येथे एकूण २७२ खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सज्ज केले. यासाठी डॉक्टरांसह ५०० परिचारिका व प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.

१०.५० कोटींचा खर्च
पाच रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावर ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय सज्ज केली आहेत.

मेयो, मेडिकलचा भार कमी कसा होणार?
कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक बघता केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाची रुग्णालये सज्ज करण्यात आली. परंतु डॉक्टर व परिचारिका नसल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी कसा करणार, असा प्रश्­न कायम आहे.

हॉटेलमध्ये अडीच हजार शुल्क
शहरातील आठ हॉटेल कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण राहू शकतील; मात्र यासाठी रुग्णांना दररोज अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.

मनपा कर्मचाऱ्यांचीच उपचारासाठी भटकंती
महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागली. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनाही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

Web Title: Kovid Health Center in Nagpur could not find a doctors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.