मेडिकलमध्ये कोंडतोय रुग्णाचा ‘श्वास’!
By Admin | Updated: November 14, 2015 02:58 IST2015-11-14T02:58:16+5:302015-11-14T02:58:16+5:30
रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ...

मेडिकलमध्ये कोंडतोय रुग्णाचा ‘श्वास’!
सुमेध वाघमारे नागपूर
रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे. कधी स्ट्रेचर राहते तर त्याला ओढणारा अटेन्डंट राहत नाही, तर कधी हे दोन्ही शोधून सापडत नाही. अशावेळी रुग्णाला पाठीवर घेऊन तर कधी कडेवर घेऊन धावाधाव करावी लागते. ती बिकट वेळ निभवून नेताना दमछाक होते. अनेकवेळा रुग्णाच्या जीवावरही बेतते. रुग्णाच्या ‘श्वासा’साठी आप्तांची धडपड नेहमीच दिसून येते.
मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून मेडिकलची ख्याती आहे. मेडिकलमध्ये ४६ वॉर्ड मिळून १४०१ खाटांची व्यवस्था आहे. रुग्णालयात रोज १५०० ते १६०० रुग्ण दाखल होतात. बाह्य रुग्ण विभागात १६०० ते २ हजार रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. परंतु येथे पदोपदी आवश्यक सेवेचा अभाव असल्याचे दिसून येते. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला किंवा कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणले की त्याला स्ट्रेचरने अपघात विभागात किंवा बाह्यरुग्ण विभागात नेले जाते.
त्यानंतर संबंधित वॉर्डात उपचारासाठी नेण्यात येते. सध्या मेडिकलच्या अपघात विभागात रुग्णांची ने-आण करण्यासाठी पाच ते सहा स्ट्रेचर व दोन ते तीन व्हील चेअर्स आहेत. एकूण ४६ वॉर्डात प्रति वॉर्ड एक किंवा दोन असे जवळपास ६५ ते ७० स्ट्रेचर असल्याचे मेडिकल प्रशासनाकडून सांगण्यात येते.
प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात किंवा विविध वॉर्डामध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची आहे. संबंधित वॉर्डाच्या डॉक्टरांना आणि परिचारिकेला विचारणा केली असता ते सुद्धा दुर्लक्ष करीत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांनाच तुम्ही पहा, अशी उत्तरे मिळतात.
त्यामुळे स्ट्रेचर किंवा व्हील चेअर्स शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शोध घ्यावा लागतो.
कधी मिळेल सुविधा ?
मेडिकलमध्ये कोंडतोय रुग्णाचा ‘श्वास’!
नागपूर : रुग्णालयात स्ट्रेचर आणि तो ओढणारा अटेन्डंट दोन्ही एकाच वेळी मिळणे हे रुग्णाच्या नशीबाचा भाग मानला जाते, परंतु बहुसंख्य रुग्णांच्या नशिबी ही बाब येत नाही. एक तर त्याला अटेन्डंट मिळतो किंवा स्ट्रेचर. अनेकवेळा हे दोन्ही मिळत नाही. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर किंवा व्हील चेअर्ससाठी ताटकळत उभे राहावे लागते.
धक्कादायक म्हणजे, आॅक्सिजन लावलेल्या रुग्णालाही स्ट्रेचर व अटेंडंट मिळत नाही. अशावेळी लहान मुलगा असेल तर त्याला कडेवर घेऊन तर मोठा इसम असेल तर त्याला आधार देत किंवा पाठीवर बसवित दुसरा नातेवाईक आॅक्सिजनचे सिलिंडर ओढताना दिसून येतो. यात सिलिंडर संपले, आॅक्सिजनचा मास्क घसरल्यास थेट रुग्णाच्या जीवावर बेतते. (प्रतिनिधी)