लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आहेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याने कोल्हापूर पोलिसांना चौकशीदरम्यान मदत करणाऱ्या पाच जणांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांना समन्स बजावले असून, त्यांची सखोल चौकशी होणार आहे. त्यात नागपुरातील त्याच्या तीन सहकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, कोरटकरला भेटणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे काय झाले, याबाबत पोलिस विभागाकडून गुप्तता पाळली जात आहे.
हा चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे ११ ते १५ मार्चदरम्यान लपून होता. दरम्यान, त्याला मदत करणा-यांची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी थेट चंद्रपूर गाठून हॉटेल मालक सलूजा व सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी यांची चौकशी केली.
चंद्रपूर पोलिसांनी कोरटकर याच्याबाबत दिलेल्या माहितीवरच कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केली. त्याला पोलिस कोठडीत घेतल्यानंतर त्याने चंद्रपुरात मदत करणाऱ्यांची नावे सांगितले. या आधारावर गुरुवारी कोल्हापूर पोलिस चंद्रपुरात दाखल झाले. त्यांनी हॉटेल मालक सलूजा, व्यवस्थापक व सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी यांची चौकशी केली, तसेच त्यांना समन्स देत कोल्हापूर येथे बयाण देण्यास बोलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागपुरातील तीन सहकाऱ्यांची होणार चौकशी२५ फेब्रुवारी रोजी कोरटकरविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. महिनाभराच्या कालावधीत तो नेमका कुणासोबत होता, त्याला कुणाकुणाची मदत मिळाली, तो कोणत्या वाहनांमधून फिरला, आदी बाबींची चौकशी करण्यात आली. त्याला मदत करणाऱ्या पाच जणांमध्ये प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिकजत अली, राजू यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, विदर्भातील काही बुकींशी त्याचे संबंध असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. कोणत्या बुकींनी त्याची मदत केली, याचीदेखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसेच त्याला ऑनलाइन पेमेंट कुणी केले याचा शोधदेखील सुरू आहे.
कोरटकरने डिलिट केले फोटोदरम्यान, कोरटकरला फेसबुकवर मोठ मोठे पोलिस अधिकारी, नेते यांच्यासोबत फोटो टाकण्याची सवय होती. कोरटकर जवळपास दररोज सोशल मीडियावर विविध गोष्टी पोस्ट करत होता. मात्र, त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरील अनेक फोटो डिलिट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे एक अकौंटदेखील डिलिट झालेले आहे. कोरटकरच्या पत्नीने त्याचा मोबाइल नागपूर पोलिसांच्या हवाली केला होता व तो मोबाइल पुढे कोल्हापूर पोलिसांना सोपविण्यात आला होता. मात्र, त्यातील डेटा त्याने अगोदरच डिलिट केला होता.
चंद्रपूरच्या बुकीमालकाची आलिशान कार दिमतीलाचंद्रपूरचा बुकीमालक धीरज चौधरीची आलिशान कार कोरटकर लपण्यासाठी वापरत होता. तो फरार असताना तेलंगणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांत होता. तो बुकीमालकासह अन्य चारजणांसोबत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.