कोकिन तस्करीत नायजेरियन गजाआड

By Admin | Updated: February 3, 2017 02:47 IST2017-02-03T02:47:22+5:302017-02-03T02:47:22+5:30

देशातील विविध भागात कोकिन पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपी सॅण्डी इग्वे न्वागू (वय ३५) याला गुन्हे शाखेच्या पथकाने

Kokkin smuggled Nigerian Gaza Aad | कोकिन तस्करीत नायजेरियन गजाआड

कोकिन तस्करीत नायजेरियन गजाआड

आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा : नाट्यमयरीत्या पकडले
नागपूर : देशातील विविध भागात कोकिन पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपी सॅण्डी इग्वे न्वागू (वय ३५) याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी नाट्यमयरीत्या अटक केली. तो नायजेरियातील रहिवासी आहे. पोलिसांनी सॅण्डीला अटक करण्यासाठी मुंबई गाठली होती. मात्र, तेथे फोनवर संपर्क केल्यानंतर त्याने नागपुरात येण्याचे सांगून पोलिसांचा मार्ग सोपा केला.
मुंबईतील कोकिन तस्कर पराग नारायण सामाणी (वय ४४) याला गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यात अटक केली होती. पोलीस कस्टडीतील चौकशीत त्याने आपण फोन केल्यानंतर पाहिजे त्या ठिकाणी एक नायजेरियन आरोपी आपल्याला कोकिन आणून देतो. मुंबईत तो कुठे मिळेल, त्याचीही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे त्या आरोपीला अटक करण्यासाठी प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक सोमवारी मुंबईला गेले.
मुंबई पोलिसांच्या मदतीने तब्बल ३६ तास परिश्रम घेतल्यानंतर कोकिनची खेप पोहोचविणाऱ्या सॅण्डीसोबत संपर्क झाला. त्याने बुधवारी नागपुरात कोकिनची खेप घेऊन येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार धावपळ करीत पोलीस पथक नागपुरात आले. गीतांजलीने आलेला सॅण्डी बुधवारी रात्री ८ च्या सुमारास मानस चौकात पोहोचला. पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेताच तो पळू लागला.
मात्र, काही अंतरावरच सॅण्डीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २ लाख ४६ हजारांची ४१ ग्रॅम कोकिन, तीन मोबाईल, दोन हजार रुपये आणि पासपोर्ट सापडला. तो जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात दोन आरोपींसह एकूण ५ लाख ७६ हजार किमतीची ९६ ग्रॅम कोकिन, पाच मोबाईल तसेच नगदी ३,७५० असा एकूण ६ लाख ८,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक देवेंद्र वंजारी, उपनिरीक्षक नरेंद्र गिरी, हवालदार दत्ता बागुल, प्रवीण फंदाडे, विठोबा काळे, नायक सतीश पाटील, नितीन रांगणे, तुळशी शुक्ला, किशोर महंत, संदीप ढोबळे, महिला शिपाई रुबीना शेख तसेच सायबर सेलचे सहायक निर्रीक्षक विशाल माने, शिपाई राहुूल, अश्विन यांनी बजावली. (प्रतिनिधी)

... सॅण्डी बोलेना
सॅण्डीला अटक केल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्याचा कोर्टातून ५ दिवसांचा पीसीआर मिळवला. सॅण्डी हाती लागून आता २४ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, त्याच्याकडून अद्याप विशेष अशी माहिती पोलिसांना मिळालेली नाही. कोकिन तस्करीचा मुख्य अड्डा आणि सूत्रधार कोण, ते सांगायला सॅण्डी तयार नाही. पोलीस त्याला जे विचारतात ते कळत नसल्याचे सॅण्डी भासवतो आहे. तो जे बोलतो, ते पोलिसांना कळत नाही. विशेष म्हणजे, सॅण्डीसारखे अनेक नायजेरियन मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागात अमली पदार्थांची तस्करी आणि लॉटरीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करण्यात सक्रिय आहेत. कमाईचे साधन म्हणूनच ते या गोरखधंद्यात सक्रिय असतात. हजारातील एखाद्या प्रकरणात त्यांना अटक होते. कोठडीत त्यांच्याकडून फारशी महत्त्वाची माहिती मिळत नाही. कारागृहात पोहचल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या पासपोर्टवरून ते भारतात कोणत्या कारणावरून आले, त्याची माहिती मिळते. त्यानंतर त्यांचा व्हिसा कधीचाच संपल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची भारतातून हकालपट्टी करण्यात येते. अनेक प्रकरणात यापूर्वी असे झाले आहे.

Web Title: Kokkin smuggled Nigerian Gaza Aad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.