सकळांस कळो मानवता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 03:03 IST2015-07-17T03:03:47+5:302015-07-17T03:03:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अखेर नागपूर विद्यापीठाला तीन वर्षांनंतर जाग आली आहे.

सकळांस कळो मानवता...
अखेर विद्यापीठ झुकले : राष्ट्रसंतांच्या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसार करणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अखेर नागपूर विद्यापीठाला तीन वर्षांनंतर जाग आली आहे. तुकडोजी महाराज अध्यासनात समाविष्ट असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंतांचे संस्कार रुजावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे तुकडोजी महाराज विचारधारेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शुल्क हे इतर अभ्यासक्रमांप्रमाणे केवळ दोन ते अडीच हजार रुपये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकमत’ने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाची विद्यापीठाला ‘अॅलर्जी’ असल्याचा विषय सातत्याने लावून धरला होता हे विशेष.
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव जरी देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात प्रशासनाने वारंवार उदासीनताच दाखविल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. तीन वर्षे झाली तरी तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक्रमाचे न ठरलेले शुल्क, नावालाही न झालेला प्रचार-प्रसार अन् सल्लागार मंडळाची एकदाही न झालेली बैठक, इत्यादी बाबींमुळे या विभागात एकाही विद्यार्थ्याचा अद्यापपर्यंत प्रवेश झाला नाही. यासंदर्भात तुकडोजी महाराज अध्यासनाच्या सल्लागार समितीची गुरुवारी विद्यापीठात पहिलीवहिली बैठक झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ.काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.भूपेश चिकटे, कला शाखेच्या अधिष्ठाता डॉ.शरयू तायवाडे, डॉ.भाऊ दायदार, डॉ.निहाल शेख, जयमाला डुमरे, ज्ञानेश्वर रक्षक व सल्लागार समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यांवर मंथन झाले.
एक विद्यार्थी आला तरी अभ्यासक्रम सुरू होणार
गेल्या तीन वर्षांत एकही विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांत प्रवेश झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता एकही विद्यार्थ्याने यात प्रवेश घेतला तरी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रसंतांच्या कार्याशी जुळलेल्या संस्थादेखील या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी तसेच राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करणार आहेत. दरम्यान, या विभागाची जबाबदारी असलेले डॉ.अक्षयकुमार काळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुलगुरूंच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. ३१ जुलै रोजी मी निवृत्त होत असल्याने या विभागाच्या जबाबदारीतून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, अशी विनंती प्रशासनाला केली असल्याचे त्यांनी सांगितले.