किचनचे बजेट बिघडले!

By Admin | Updated: July 7, 2014 01:04 IST2014-07-07T01:04:43+5:302014-07-07T01:04:43+5:30

जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. भाज्यांची आवक

Kitchen budget spoiled! | किचनचे बजेट बिघडले!

किचनचे बजेट बिघडले!

भाज्यांचे भाव आकाशाला भिडले : स्थानिकांची आवक घटली
नागपूर : जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. भाज्यांची आवक अर्ध्यावर आल्याने दरवाढीचे नवे संकट नागपूरकरांसमोर उभे ठाकले आहे. घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात ‘लुटमार’ सुरू असल्याने ग्राहकांचा कमी दरातील भाज्यांच्या खरेदीवर जोर आहे. आवक कमी असल्याने भाज्यांचे भाव आकाशाला भिडले असून त्यामुळे गृहिणींचे धाबे दणाणले आहे. त्यांनी कडधान्याचा आधार घेतला आहे.
टमाटर ३० , सांभार ६०!
वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका बाहेरून येणाऱ्या भाज्यांनाही बसत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये भाज्या विकत घेताना श्रीमंतांनाही खिशाकडे डोकावून पाहावे लागत आहे. किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. काही भाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांची खरेदी सामान्यांना परवडणारी नाही. भाज्या महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही दर वाढविले आहेत. सर्वसाधारण १५ ते २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी फूलकोबी किरकोळमध्ये ३५ रुपयांवर गेली.
सांभार ठोकमध्ये ५० रुपयांवर गेल्याने किरकोळमध्ये ७० ते ८० रुपयात विक्री सुरू आहे. टमाटर ३० रुपयांवर गेले आहे. पावसाअभावी भाज्यात महागच मिळतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.
नागपुरात टमाटरची आवक संगमनेर आणि नाशिकहून आहे. कॉटन मार्केट ठोक बाजारात जबलपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, फूलकोबी छिंदवाडा, सांभार नाशिक, छिंदवाडा, पत्ताकोबी मुलताई, तोंडले भिलाई, रायपूर, दुर्ग, इंग्लिश वॉल दिल्ली, हिरव्या मिरची जगदलपूर, हवेली येथून येत आहेत. याशिवाय स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, वांगे, पालक, आदींची आवक आहे.
आवक मंदावली
ठोक बाजारात दररोज ९० ते १२० लहानमोठ्या गाड्यांची आवक आहे. नागपुरातून माल अन्य ठिकाणी विक्रीस जातो.
शहराला पुरेल एवढी आवक नसल्याने भाज्या महाग झाल्याचे महाजन यांनी सांगितले. पत्ताकोबी, पालक, वांगे कोहळे आटोक्यातभाज्यांची आवक कमी असल्याने बहुतांश भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. गृहिणींसमोर पत्ता कोबी, पालक, वांगे आणि कोहळ्याचा पर्याय आहे. मशागतीसाठी शेत खाली झाल्याने केवळ २० टक्के शेतात भाज्या आहेत. आॅगस्ट अखेरपासून आवक वाढेल. दसरा आणि दिवाळीपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात राहील. तोपर्यंत भाज्या महागच मिळतील. (प्रतिनिधी)
कांदे व बटाटे ३० रुपयांवर!
केंद्र शासनाने कांदे आणि बटाटे जीवनाश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्याने साठेबाज आणि शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मध्यंतरी कमी झालेली आवक वाढली आहे. लाल कांदे १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांद्यांची सात ते आठ ट्रकची आवक आहे. दर्जानुसार लाल कांदा ८४० ते ८८० रुपये मण (४० किलो) आणि पांढरा कांदा ६८० ते ७२० रुपये मण आहे. निर्यात वाढली असली तरीही कांद्याचे भाव वाढणार नाहीत. गेल्यावर्षीची स्थिती यावर्षी उद्भवणार नाही, अशी प्रतिक्रिया कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. बहुतांशवेळी कांद्याची साठवणूक ही जोखीम ठरू शकते, ही कल्पना शेतकऱ्यांना आल्याने बहुतांश शेतकरी कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांकडे साठवणुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकरी पैसा उभा करण्यासाठी मालाची विक्री करू लागले आहेत. सर्वाधिक आवक अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यातून असून एखाद्या ट्रक चाळीसगाव येथून येत आहे. भाज्याच्या किमती वाढताच गृहिणींकडून बटाट्याला मागणी वाढली. याशिवाय आवक कमी असल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात भाज्या महाग होण्याच्या भीतीने बटाट्याचा किमती वाढू लागल्या आहेत. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयांवर भाव गेले आहेत. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे. ट्रकचे भाडे वाढल्याच्या परिणाम बटाट्याच्या किमतीवर झाला आहे.

Web Title: Kitchen budget spoiled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.