लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ येथे २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या किसान महापंचायतला (शेतकरी महामेळावा) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. परंतु आयोजकांनी कोरोनाच्या नियमानुसार सभा घेण्यासंदर्भात नव्याने अर्ज सादर केला आहे. हा अर्ज सध्या तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. परंतु यवतमाळची सभा ही कोरोनाचे नियम पाळून ठरलेल्या दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळी होईल आणि सभेला संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत हे मार्गदर्शनही करतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाचे विदर्भ संयोजक शेतकरी नेते श्रीकांत तराळ आणि महासंघाचे कोअर कमिटी सदस्य व महाराष्ट्राचे संयोजक संजय गिड्डे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केला.
तराळ आणि गिड्डे पाटील यांनी सांगितले की, दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे ते केवळ दोन-चार राज्यापुरते मर्यादित नाही, तर देशव्यापी आहे. हे सरकारला कळावे म्हणून देशात विविध ठिकाणी किसान महापंचायत होत आहे. महाराष्ट्रातही त्यासाठीच आयोजन करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा याच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात केली होती. याच ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, स्वामीनाथन आयोग पूर्णपणे लागू करण्याचे आणि एमएसपी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या सभेेसाठी यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आली. तब्बल एक लाख लोक येतील, असे नियोजन करण्यात आले. तयारीही पूर्ण झाली. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने थोडी अडचण आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या महासभेला परवानगी नाकारली. यासोबतच कोरोनाची नियमावली सादर केली. या कोरोनाच्या नियमावलीनुसार सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच नव्याने अर्ज सादर करण्यात आला आहे. अजून तरी हा अर्ज प्रलंबित आहे. परंतु प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पूर्वीसारखी सभा होणार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून सभा घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला मलिकंतसिंग बल, सुनील चोखारे, भंते महेंद्र रत्न उपस्थित हाेते.