राजा गंथाड्याचा खून
By Admin | Updated: November 17, 2016 02:57 IST2016-11-17T02:57:31+5:302016-11-17T02:57:31+5:30
जुन्या वैमनस्यातून बुधवारी सकाळी गंगा-जमुना या वस्तीत एका कुख्यात गुन्हेगाराचा गळा कापून खून करण्यात आला.

राजा गंथाड्याचा खून
गंगा-जमुनातील घटना :
तीन आरोपी अटकेत
नागपूर : जुन्या वैमनस्यातून बुधवारी सकाळी गंगा-जमुना या वस्तीत एका कुख्यात गुन्हेगाराचा गळा कापून खून करण्यात आला. राजा गंथड्या ऊर्फ राजेश सुरेश बेलेकर असे मृताचे नाव आहे. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपीला अटक केली आहे. रोशन चौरसिया (२६) रा. पारडी, सोनू साखरे (२६) रा. खदान ज्योतीनगर आणि संतोष उर्फ बालू गोसावी (२८) रा. अखाडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी सात हजार रुपयावरून राजन गंथाड्या आणि रोशन यांच्यात वाद झाला होता. या वादावरूनच गंथाड्याचा खून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राजा गंथाड्या हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो गंगा जमुना वस्तीत सायकल स्टँड चालवित होता. त्याच्याविरुद्ध खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोशन भाड्याने आॅटो चालवितो. सोनू साखरे रोशनचा जवळचा मित्र आहे. बालू श्रीवास हा काही दिवसांपासून राजा गंथाड्याच्या सायकल स्टँडवरच काम करीत होता. मृत राजाला रोशनने काही रुपये उधार दिले होते. ते रुपये तो परत मागत होता. परंतु रुपये परत करण्याऐवजी आपल्यासोबत मिळून काम करण्यासाठी राजा रोशनला धमकावत होता. रोशनने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला असता तो त्याला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. या धमकीमुळे रोशन घाबरू लागला. रोशनने याबाबत त्याचा पानठेला चालक मित्र सोनू साखरेला सांगितले. सोनूचा गंगा जमुना वस्तीत पानठेला आहे. तो सुद्धा राजा गंथाड्यापासून त्रस्त होता. त्यामुळे त्या दोघांनी त्यालाच संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी राजा गंथाड्याचा विश्वासू व्यक्तीची गरज होती. त्या दोघांनी संतोषलाही आपल्यासोबत मिळवून घेतले. दोन दिवसापूर्वीच राजाने संतोषला मारहाण केली होती.
ठरलेल्या योजनेनुसार तिन्ही आरोपी बुधवारी सकाळी ४ वाजेपासून राजा गंथाड्याची वाट पाहत होते. संतोष सायकल स्टँडवर होता तर रोशन व सोनू थोड्या अंतरावर होते. सकाळी ६.१५ वाजता राज गंथाड्या सायकल स्टँडवर आला. येताच तो प्लास्टीकच्या खुर्चीवर बसला.
काही वेळाने रोशन व सोनू मोटारसायकलने आले. येताच ते दोघेही राजा गंथाड्यावर धावून गेले. शस्त्रासह त्याच्यावर हल्ला केला. हल्ला होताच राजा पळून जाऊ लागला. परंतु रोशन व सोनूने पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून त्याचा खून केला.
रोशन व सोनूने खुनाची कबुली दिली आहे. राजा गंथाड्याचा गंगा जमुना परिसरात दबदबा वाढला होता. तो या वस्तीत बाहेरून येणाऱ्या लोकांना लुटत होता. विरोध करणाऱ्यांना मारायचा. सकाळी खुनाची माहिती सूचना मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा घटनास्थळी पोहोचले. लकडगंज पोलिसांनी तीन आरोपीला अटक केली आहे.
सैनिकाच्या खुनात होता सहभागी
सूत्रानुसार गंगा-जमुना वस्तीत एका सैन्यातील जवानाचा खून करण्यात आला होता. त्यात मृत राजा गंथाड्या आणि त्याचे पाच साथीदार सहभागी असल्याचे सांगिले जाते. राजाने बालाजी मंदिराजवळ एक आलिशान घर बांधले आहे.