लुटारूंचा जमावावर चाकू हल्ला
By Admin | Updated: October 12, 2015 02:47 IST2015-10-12T02:47:38+5:302015-10-12T02:47:38+5:30
लुटमार करताना नागरिकांनी रंगेहात पकडल्यामुळे पळून जाण्यासाठी लुटारूंनी जमावातील दोघांवर चाकूहल्ला केला.

लुटारूंचा जमावावर चाकू हल्ला
दोन आरोपींची बेदम धुलाई : जरीपटक्यातील घटना
नागपूर : लुटमार करताना नागरिकांनी रंगेहात पकडल्यामुळे पळून जाण्यासाठी लुटारूंनी जमावातील दोघांवर चाकूहल्ला केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन लुटारूंची बेदम धुलाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्यांचा एक साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
मोहम्मद फयीम मोहम्मद उस्मान अन्सारी (वय ३१, रा. कामगार नगर) हे जरीपटक्यातील एचपी पेट्रोल पंपाजवळून शनिवारी रात्री १०.३० ला घरी जात होते. गौतम लक्ष्मण बगारे (वय २८) आणि मोंटू रमेश चंद्रिकापुरे (वय २२, रा. दोन्ही मानकापूर) तसेच त्यांच्या एका साथीदाराने फयीमला रोखले. चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत आरोपींनी फयीमजवळचे ५०० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. फयीमने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी पकडल्यामुळे लुटारूंनी दोन नागरिकांवर चाकू हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोघांची बेदम धुलाई केली. त्यांना नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एक आरोपी मात्र पळून गेला. जरीपटका पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
आरोपींच्या हल्ल्यात एक गंभीर
हल्लेखोरांनी चाकू व काठीने हल्ला चढवल्यामुळे शुभम अशोक शेंडे (वय २२, रा. जुनी सोमवारी क्वॉर्टर) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री १० च्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत विमा दवाखाना चौकातील पान टपरीवर उभा असताना चौघांनी त्याला गंभीर जखमी केले. अनिल अशोक शेंडे (वय २८) यांच्या तक्रारीवरून सक्करदराचे एपीआय जी.के. फुलकवर यांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.