अपहृत भावंडांची हत्या

By Admin | Updated: December 4, 2015 03:03 IST2015-12-04T03:03:03+5:302015-12-04T03:03:03+5:30

सख्ख्या भाच्यांचे अपहरण करून एका मामाने दोन निरागस जीवाची हत्या केली; नंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Killing of abducted siblings | अपहृत भावंडांची हत्या

अपहृत भावंडांची हत्या

मामा बनला कंस : मध्य प्रदेशात आढळले मृतदेह
नागपूर : सख्ख्या भाच्यांचे अपहरण करून एका मामाने दोन निरागस जीवाची हत्या केली; नंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जरीपटक्यातील कामगारनगरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे.
अकबरी खान मोहम्मद इलियाज (वय १३) आणि नुरैन अन्सारी मोहम्मद इलियाज (वय ११), अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. हे भावंड जरीपटक्यातील कामगारनगरात राहायचे. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. इलियाजचा साळा (मेव्हणा) कुतुबुद्दीन ऊर्फ सुहानी अन्सारी (वय २६) सिवनी जिल्ह्यातील छत्तरपूर (मध्य प्रदेश) येथे राहायचा. काही दिवसांपूर्वी तो नागपुरात आला. तो टायर पंक्चरचे दुकान चालवायचा. त्याचा काही दिवसांपूर्वी बहीण आणि जावयाशी वाद झाला. त्यानंतर आरोपी अन्सारीने २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता अकबरी आणि नुरैन या दोघांना आपल्या मोटरसायकलवर (एमएच ३१/डीवाय २७५२) बसवले. ताजबागमधून फिरून येऊ, असे म्हणत या नराधमाने घरून बहीण-भावाला (भाच्यांना) सोबत नेले, मात्र नंतर तो परतच आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे अपहृत बालकांचे वडील इलियाज यांनी २८ नोव्हेंबरला जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, मामानेच सोबत नेल्यामुळे फारसा गांभीर्याने तपास केला नाही.
या नराधमाने छपरा गावाजवळ कंसाचे रूप धारण करून आपल्या दोन भाच्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रात फेकून तो पळून गेला. २९ नोव्हेंबरला मृतदेह मिळाल्यानंतर तेथील पोलिसांनी ओळख पटविण्याऐवजी मृतदेहावर अंत्यसंस्कारही करून टाकले. दरम्यान, राज्य पोलिसांकडून मिसिंगच्या माहितीवरून या दोन बालकांची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना कळाल्याने ते नागपुरातील बालके असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी जरीपटका ठाण्यात संपर्क साधला. ठाणेदार संजय सांगळे यांनी पोलीस पथक छपराकडे रवाना केले. मृत बालकांचे आई-वडील आणि नातेवाईक तिकडे रवाना झाले होते. या घटनेची माहिती कामगारनगरात पसरताच तीव्र शोककळा पसरली. या अपहरण आणि दुहेरी हत्याकांडामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपीही फरार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Killing of abducted siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.