पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:16+5:302021-04-04T04:09:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जरीपटक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या उमेश उर्फ जितू मोहनदास गरगानी (वय ३४) याची हत्या पोलिसांचा ...

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून केली हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - जरीपटक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या उमेश उर्फ जितू मोहनदास गरगानी (वय ३४) याची हत्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजेश उर्फ राजा मेथवानी आणि राहुल या मामा भाच्याला अटक केली आहे.
आरोपी राजा, राहुल आणि मृतक जितू हे चांगले मित्र होते. जितू कधी कॅटरर्सचे तर कधी वेगवेगळे दुकान लावत होता. आरोपी राजा अवैध दारू विक्री करायचा. त्याला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला. दारूच्या धंद्याची जितूनेच पोलिसांना टीप दिली असावी, असा त्याच्या मनात संशय होता. त्यावरून राजा जितूला पाण्यात पाहत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जितू त्याची आई मीरा आणि बहीण मायासोबत घरी असताना आरोपी राहुल त्याला घरून बोलवून नेेले. काही वेळेनंतर पिंटू बजाज नामक तरुणाचा जितूच्या आईला फोन आला. राजा आणि राहुल जितूसोबत वसन शाह चौकात भांडण करीत असल्याचे पिंटूने सांगितले. त्यामुळे जितूची आई मीरा गरगानी लगेच तेथे पोहचल्या. आरोपींनी जितूच्या चेहऱ्यावर मिरची पावडर झोकून त्याला घातक शस्त्राने भोसकले होते. गंभीर जखमी झालेल्या जितूला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी जितूला मृत घोषित केले. त्याची आई मीरा गरगानी यांची तक्रार नोंदवून घेत जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मामाभाचा राजा आणि राहुलला अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करून त्यांचा ६ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला.
----