पाचपावलीत तरुणाची हत्या
By Admin | Updated: June 5, 2017 01:44 IST2017-06-05T01:44:35+5:302017-06-05T01:44:35+5:30
दोन गटात गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले.

पाचपावलीत तरुणाची हत्या
सशस्त्र हाणामारीत आरोपीसुद्धा जखमी डोक्यात गोळी घातली आरोपी फरार चार महिन्यापासून
धुमसणाऱ्या वादाचे पर्यवसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन गटात गेल्या चार महिन्यांपासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. तशात प्रतिस्पर्धी हल्लेखोरांनी मोहम्मद आबिद (वय २४) नामक तरुणाच्या डोक्यात गोळी घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर, त्याच्या साथीदारांसह अन्य काही आरोपी या सशस्त्र हाणामारीत जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड थरार अन् तणाव निर्माण झाला होता.
मोहम्मद आबिद आणि आरोपी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख या दोघांच्या गटात अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. विटाभट्टींसह अवैध धंद्यांशी ते जुळले आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी एकमेकांवर हल्ले करणे, हाणामाऱ्या करून वाहने फोडणे,असे प्रकारही केले आहे. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना आसिफच्या घरावर जोरदार हल्ला झाला होता. त्याच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. त्यात आबिदचा पुढाकार असल्याचे समजल्यापासून या दोघांमधील वाद अधिकच तीव्र झाला होता.
या पार्श्वभूमीवर, रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आसिफ आणि आबिद या दोघांची वाहने १० नंबर पुलावर समोरासमोर आली. एकमेकांना साईड देण्याऐवजी त्यांनी परस्परांच्या वाहनांना जोरदार धडक मारली. यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. ‘छोडेंगे नही, देख लेंगे’, अशी धमकी देत दोघेही यावेळी निघून गेले. त्यानंतर दोघांनीही शस्त्र आणि साथीदारांची जमवाजमव केली.
एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरणारे दोन्ही गटातील गुंड रात्री ७.३० च्या समोर लष्करीबागेत १० नंबर पुलाजवळच्या नवा नकाशा परिसरात (किदवई ग्राऊंडजवळ) समोरासमोर आले. त्यांनी प्रारंभी शिवीगाळ, बाचाबाची आणि नंतर सशस्त्र हाणामारी केली. त्यानंतर आसिफने स्वत:जवळचे पिस्तूल काढले आणि तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी आबिदच्या डोक्यात शिरल्याने तो जागीच ठार झाला तर, त्याच्या एका मित्राला गोळीची जखम झाली. आबिदच्या अन्य साथीदारांसोबत आरोपींचे काही साथीदारही गंभीर जखमी झाले. आसिफने गोळी घालून आबिदला ठार मारताच आबिदचे साथीदार दहशतीत आले. ते पळून गेले. या हल्ल्यात आबिदच्या एका मित्राला गोळीची जखम झाल्याचे सांगितले जाते. मात्र, पोलिसांकडून तशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे आबिदच्या अन्य काही साथीदारांसोबत आरोपी आसिफचे काही साथीदारही गंभीर जखमी झाले.
वर्चस्वासाठी केला आसिफने गेम
आरोपी आसिफ आणि मृत आबिद हे दोघेही सामाजिक संघटनेच्या नावाखाली वेगवेगळ्या समूहाशी जुळले आहेत. काही राजकीय नेत्यांसोबतही त्यांची उठबस होती. आरोपी आसिफ हा त्या भागातील युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. गुंडगिरीवर पांघरुण घालण्यासाठी आणि आपला दबदबा निर्माण करण्यासाठी तो राजकीय पांघरुण वापरतो. सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वर्चस्व निर्माण करण्याचा तो प्रयत्न करीत आहे. आसिफ आबिदचा गेम करण्याची संधी शोधत होता. अखेर रविवारी त्याने डाव साधला.