कॉँग्रेस आणि भाजप समर्थित गटात थेट लढत
कामठी : कामठी तालुक्यातील खेडी ग्रा.पं.च्या नऊ जागांसाठी सत्ताधारी आदर्श ग्राम विकास आघाडी विरोधात संघर्ष महाविकास आघाडीने दंड थोपाटले आहे. येथे तीन वॉर्डातील ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक १ मध्ये भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीकडून माजी उपसरपंच सच्चेलाल घोडमारे तर काँग्रेस समर्थित संघर्ष महाविकास आघाडीकडून अमोल ठाकरे रिंगणात आहेत. याच वाॅर्डातून अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव असलेल्या जागेकरिता आदर्श ग्राम विकास आघाडीकडून भारतीय देवगडे तर संघर्ष महाआघाडीकडून भाग्यश्री धोटे रिंगणात आहेत. सर्वसाधारण महिलांकरिता राखीव असलेल्या एका जागेसाठी याच वॉर्डातून आदर्श ग्राम विकास आघाडीकडून भाग्यश्री बोरकर यांच्याविरोधात संघर्ष महाआघाडीकडून माजी सदस्यता वैशाली सिंगारे रिंगणात आहेत. वाॅर्ड क्रमांक २ मधून अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष महाविकास आघाडीकडून उमेश देवगडे यांच्या विरोधात आदर्श ग्राम विकास आघाडीकडून गिरधर देवगडे हे रिंगणात आहेत. याच वाॅर्डातून इतर मागासवर्ग महिलांकरिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष विकास आघाडीकडून शुभांगी गावंडे तर आदर्श ग्राम विकास आघाडीकडून सीमा गावंडे रिंगणात आहेत. याच वॉर्डात सर्वसाधारण महिलांकरिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष महाविकास आघाडीकडून नेहा ढोक तर आदर्श ग्राम विकास आघाडीकडून अंजना मानकर रिंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक ३ अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष विकास आघाडीकडून मनोज खडसे रिंगणात असून, त्यांच्या विरोधात आदर्श ग्राम विकास आघाडीकडून सौरभ मेंढे उभे आहेत. याच वॉर्डात इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल हिवरकर तर आदर्श ग्राम विकास आघाडीकडून नामदेव ठाकरे रिंगणात आहेत. याच वाॅर्डातून साधारण महिलाकरिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष विकास आघाडीकडून वंदना भोयर रिंगणात तर, आदर्श ग्राम विकास आघाडीकडून भारती धोगळे या रिंगणात आहेत. खेडी ग्रा.पं.वर वर्चस्व कायम राहण्यासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, विद्यमान सरपंच मीराबाई काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर यावेळी सत्तापक्षाला धक्का देण्यासाठी संजय काळे मैदानात उतरले आहेत.
एकूण वाॅर्ड : ०३
एकूण सदस्य : ०९
एकूण उमेदवार : १९
एकूण मतदार : १९१६
पुरुष मतदार : ९९२
महिला मतदार : ९२४
अशी आहे ग्रामपंचायत
खेडी,पांढुरणा, पांढरकवडा या गटग्रामपंचायतमध्ये तिन्ही गावात शेतकरी, शेतमजूर वास्तव्याला आहेत. खेडी हे गाव नागपूर शहरापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे या परिसरात बांधकाम विकासकांनी ले-आऊटचे जाळे पसरविले आहे.