मेट्रो रेल्वेविरुद्धची याचिका खारीज
By Admin | Updated: October 26, 2016 03:03 IST2016-10-26T03:03:36+5:302016-10-26T03:03:36+5:30
मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा

मेट्रो रेल्वेविरुद्धची याचिका खारीज
हायकोर्ट : भारत अर्थ मुव्हर्स कंपनीला दणका
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्याचा नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायम राहिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी मंगळवारी या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून कंपनीला दणका दिला. ही याचिका कंपनीने दाखल केली होती.
मेट्रो कार्पोरेशनने २५ जानेवारी रोजी नोटीस जारी करून मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे उत्पादन व इतर बाबींसाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपनीला मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन व उत्पादनाचा १० वर्षांचा अनुभव आवश्यक होता. याशिवायही विविध पात्रता निकष होते.
कार्पोरेशनने २९ सप्टेंबर रोजी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीला ई-मेल पाठवून त्यांची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्यात आल्याचे कळविले. हा निर्णय रद्द करून तांत्रिक बोलीचा पुनर्विचार करण्यात यावा, आर्थिक बोली उघडण्यात यावी व तेव्हापर्यंत निविदा वाटप करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती कंपनीने न्यायालयाला केली होती.
न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कार्पोरेशनचा निर्णय योग्य ठरविला. कंपनीतर्फे अॅड. कार्तिक शुक्ल तर, कार्पोरेशनतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अॅड. कौस्तुभ देवगडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)