गुन्हेगारांवर खाकीचा दणका

By Admin | Updated: January 30, 2016 03:02 IST2016-01-30T03:02:25+5:302016-01-30T03:02:25+5:30

आक्रमक झालेल्या नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे.

Khaki bump on criminals | गुन्हेगारांवर खाकीचा दणका

गुन्हेगारांवर खाकीचा दणका

३ दिवसात २३ गुंडांवर मकोका राजू भद्रे टोळीवरही कारवाई गुन्हेगारी विश्वाला जबर हादरा

नागपूर : आक्रमक झालेल्या नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. आधी संतोष आंबेकर, नंतर गोल्डी भुल्लर आणि शुक्रवारी राजू भद्रे टोळीवर पोलिसांनी मकोका लावला. अवघ्या तीन दिवसात शहरातील तीन मोठ्या गुंडांच्या टोळ्यांवर मकोकाची कारवाई झाल्यामुळे गुन्हेगारी विश्वाला जोरदार हादरा बसला आहे. राजू भद्रे तसेच त्याच्या टोळीतील आठ गुन्हेगारांवरील मकोकाची माहिती पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी दिली.

११ डिसेंबरला अजय राऊतचे अपहरण केल्यानंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १ कोटी ७५ लाखांची खंडणी गुंडांनी उकळली होती. अजय राऊतच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्यामुळे तो एवढी मोठी खंडणी दिल्यानंतरही गप्प बसला होता. मात्र, पोलिसांना वृत्तपत्रातून या प्रकरणाची माहिती कळली. त्यानंतर गुन्हेशाखेने राऊतची चौकशी सुरू केली. राऊतने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणकर्ते आणि खंडणी उकळणारांचा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा यात नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक शिवरामक्रिष्णन तेवर आणि भरत ऊर्फ राहुल सुशिल दुबे हे गुंड गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार दिवाकर कोतुलवार आणि राजू भद्रे असल्याचे सांगितले.

१ कोटी ७५ लाखांची मागितली होती खंडणी
नागपूर : अपहरण केल्यानंतर राऊतला मारहाण करून राजू भद्रेच्या घरामागच्या मठात नेले आणि तेथे त्याला मित्रांना फोन करायला लावून १ कोटी ७५ लाख रुपये मागवून घेतल्याचेही उघड झाले. ही पक्की माहिती उघड झाल्यामुळेच या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. उपरोक्त चार आरोपी अटकेत आहेत. राजू भद्रे कारागृहात आहे तर दिवाकर कोतुलवार (वय ३१) त्याचा भाऊ आशिष कोतुलवार (वय २८), खुशाल ऊर्फ जल्लाद ऊर्फ पहेलवान थूल आणि नितीन मोहन पाटील हे फरार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधी अधिकाऱ्याचा वादग्रस्त मुद्दा
मकोकाची केस लढविण्यासाठी पोलिसांनी १२ वकिलांचे पॅनल तयार केले आहे. त्यातील २ मुंबईचे तर १० नागपूरचे वकील असतील, असे शर्मा यांनी सांगितले. भद्रे टोळीने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६० ते ७० कोटींच्या जमिनीवर काही वर्षांपूर्वी यवतमाळातील गुंडांच्या मदतीने कब्जा केला. यावेळी एका विधी अधिकाऱ्याची भूमिका भद्रे टोळीला मदत करणारी असल्याचा जोरदार आरोप झाला होता. हा प्रकार उपायुक्त शर्मा यांच्या लक्षात पत्रकारांनी आणून दिला. त्यामुळे वकिलाच्या नियुक्तीवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. उपायुक्त शर्मा यांनी विधी अधिकाऱ्यांबाबत तूर्त आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, हा मुद्दा पुढच्या काळात वादग्रस्त ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा पत्रपरिषदेतनंतर गुन्हेशाखेत सुरू झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Khaki bump on criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.