खडसे यांचीही होणार सुनावणी
By Admin | Updated: January 6, 2017 02:26 IST2017-01-06T02:26:32+5:302017-01-06T02:26:32+5:30
भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे

खडसे यांचीही होणार सुनावणी
झोटिंग समिती : प्रत्यक्ष राहावे लागणार हजर
नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलटतपासणीदरम्यान बाजू मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना समितीसमोर प्रत्यक्ष हजर रहावे लागणार आहे. चौकशी समितीच्यावतीने तशी नोटीस लवकरच बजावण्यात येणार आहे.
एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या नातेवाईकांना दिली. ही जमीन उद्योग विभागाची असून खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दिल्याचा आरोप आहे. विरोधकांनी या कारणावरून घेरल्याने खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीने भोसरीला जाऊन जागेची पाहणी केली. मुंबई मंत्रालयातील उद्योग विभागाकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतचर दोन्ही विभागाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे समितीने मागवून घेतली. आपले मत मांडण्यासाठी खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. वकिलांनी त्यांच्यावतीने शपथपत्र दाखल केले होते. दरम्यान महसूल आणि उद्योग विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले. हिवाळी अधिवेशन काळातच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. उद्योग विभगाचे सचिवही हजर झले होते.(प्रतिनिधी)
दीड महिन्यात चौकशी पूर्ण होणार
चौकशीचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे. केवळ खडसे यांच्या उलटतपासणीनंतर चौकशी समिती आपला अहवाल शासनाला पाठवणार आहे. खडसे लवकर उपस्थित झाल्यास दीड ते पावणेदोन महिन्यात चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होणार असल्याचे सांगितले जाते.