लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महाजन यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. खडसेंकडून महाजन यांना जाणुनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. या माध्यमातून ते महाजन यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी लावला. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.
एखाद्या व्यक्तीशी फक्त संबंध असल्याचा अर्थ गुन्हा केला असं होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केलं, असा होत नाही. खडसे सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.
छावा संघटना मारहाण प्रकरणावरदेखील त्यांनी भाष्य केले. अजित पवारांचे कार्यकर्ते असोत किंवा छावा संघटनेचे, राज्यात कोणीही रस्त्यावरची लढाई लढू नये. लढाई ही वैचारिक असली पाहिजे. ‘मार्केटिंग’ करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणं, एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून निर्णय होणार नाहीत. विकसित महाराष्ट्रासाठी अशा तंट्यांना स्थान नाही. आपापसातील राड्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
हनीट्रॅप बाबतचे आरोप म्हणजे टीआरपी वाढविण्याचे कामसंजय राऊत यांना जे सांगितलं जातंय, ते विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांच्या बाजूनेच दिसत आहे. जर त्यांच्या हातात काही ठोस माहिती असती, तर ती त्यांनी माध्यमांसमोर किंवा थेट विधानसभेत मांडली असती. जनतेला संभ्रमित करून स्वतःची टीआरपी वाढवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सभागृहात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आरोप करणाऱ्यांकडे काही पुरावे असतील, तर ते समोर आणावेत, असे बावनकुळे म्हणाले.