दोष नसताना केली निर्घृण हत्या
By Admin | Updated: December 23, 2016 01:36 IST2016-12-23T01:36:47+5:302016-12-23T01:36:47+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री गोलू ऊर्फ रोहित महादेवराव गच्चीवाले (वय २२) या तरुणाला

दोष नसताना केली निर्घृण हत्या
मित्रत्वामुळे गेला गोलू गच्चीवालेचा जीव : कुटुंबीयांवर आघात
नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री गोलू ऊर्फ रोहित महादेवराव गच्चीवाले (वय २२) या तरुणाला मित्रत्वामुळे जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विनोद आणि त्याचा भाऊ विशाल लक्ष्मण जागरे, अर्जुन कृष्णराव नंदनवार आणि नीतेश नरेश बारहाते या चौघांना अटक केली. त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला.
शुभम अरुण लारोकर (वय २२, रा. नवापुरा, मशिदी जवळ, लकडगंज) याने आरोपी विनोद जागरे याला आठ हजार रुपये उधार दिले होते. शुभमचा वाढदिवस असल्याने त्याने विनोदच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता. तर, विनोद सारखी टाळाटाळ करीत होता. बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास शुभम आणि गोलू हे दोघे घराजवळ गप्पा करीत होते. तेवढ्यात तेथे विनोद आला. शुभमने त्याला आपले आठ हजार रुपये परत मागितले.
आरोपीने पुन्हा पहिल्यासारखीच टाळाटाळ केल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी विनोद आणि शुभमने एकमेकांना मारहाण केली. ते पाहून गोलू धावला. त्याने विनोदला थापडा मारल्या. त्यावेळी विनोद पळून गेला आणि त्याने आपल्या भावाला विशालला हे सांगितले. विशाल यावेळी आरोपी नंदनवार आणि बारहातेसोबत दारू पीत होता. त्यांच्याजवळ शस्त्रही होते. लुटमार करून पैसे मिळवण्याचा ते कट आखत असताना विनोदने मारहाणीची घटना सांगताच हे चौघे हत्तीनाल्याकडे आरडाओरड करीत निघाले. त्यांच्या हातात शस्त्र पाहून शुभमने धूम ठोकली. तर, आपला काही दोष नसल्यामुळे आरोपी आपल्याला काही करणार नाही, असे समजून गोलू आरामात हत्तीनालाजवळच्या गल्लीतून जाऊ लागला. आरोपींनी शुभमला सोडून गोलूवरच झडप घातली. नंदनवार आणि बारहातेने त्याला पकडून ठेवले तर विनोद आणि विशालने त्याच्यावर चाकूचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. अनेकांच्या समोर हा थरार घडला. त्यामुळे आरडाओरड करीत नागरिक इकडे तिकडे पळू लागले.
माहिती कळाल्यानंतर लकडगंज पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी गोलू गच्चीवालेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोष नसताना गोलूची हत्या झाल्याचे कळाल्याने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. धावपळ करून पोलिसांनी रात्रभरात चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त केली. (प्रतिनिधी)
टार्गेट होता शुभम
गुरुवारी सकाळपासूनच नवापुरा भागात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. शुभम टार्गेट होता, मात्र दारूच्या नशेत तर्र असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे तो शुभम आहे की गोलू हे दिसलेच नसल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, गोलूच्या हत्येने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. गोलू अतिशय गरीब परिवारातील सदस्य होता. त्याला आई, बहीण आणि भाऊ आहे. कधी पेंटिंग तर कधी कॅटरिंगच्या कामाला जाऊन तो आपल्या कुटुंबीयांचे पालन पोषण करीत होता. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अशाच प्रकारे मित्राने बोलावल्यामुळे लक्ष्मीभवन चौकात पोहचलेल्या शुभम महाकाळकरची ब्रमोतकर आणि त्याच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. त्याचा त्या भांडणाशी काही संबंध नव्हता अन् काही दोषही नव्हता. या प्रकरणातही गोलूचा कोणताही दोष नसताना मित्रत्वाखातर तो मारला गेला.