वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावेत

By Admin | Updated: January 7, 2017 02:46 IST2017-01-07T02:46:33+5:302017-01-07T02:46:33+5:30

आयकर अधिकाऱ्यांनी समाजातील वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य निर्णय घ्यावेत,

Keeping the focus of disadvantaged groups should be decided | वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावेत

वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावेत

संतोषकुमार गंगवार : एनएडीटीमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
नागपूर : आयकर अधिकाऱ्यांनी समाजातील वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय राजस्व सेवेच्या (आयआरएस) ७० व्या तुकडीच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या निशी सिंह, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक रंगनाथ झा उपस्थित होते.
गंगवार म्हणाले, शासकीय आयकर विभागाशी संबंधित तक्रारी कमीच असतात. आयकर विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये आधुनिकीकरणामुळे परिवर्तन घडत आहे. कर संकलनात आयकर विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळ्या पैशाच्या मुक्तीचा लढा केंद्र सरकारने उभारला आहे. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर कर संकलनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्यक्ष कर संकलनामध्ये आयकराचा वाटा ७ ते ८ टक्के होता, तो आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, या कर संकलनात वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर ८ लक्ष कोटीची भर पडणार आहे. कर संकलनाच्या खर्चासाठी आयकर विभाग एक टक्क्यापेक्षा कमी निधी वापरतो. येणाऱ्या काळात विभागाचे कार्यक्षेत्र अजून विस्तारेल, असे त्यांनी नमूद केले.
निशी सिंह म्हणाल्या, कर संकलनाची जबाबदारी ही कठीण असून अधिकाऱ्यांनी करदाते, सहकारी व सामान्य जनता यांच्याशी न्यायबुद्धीने वागावे. रंगनाथ झा यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये कर प्रशासनाचे प्रशिक्षण देणे, हे राष्ट्रीय विकासाचे कार्य असल्याचे सांगितले. प्रशिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संपूर्ण उत्तरदायित्वानिशी अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. प्रशिक्षण अभ्यासक्रम संचालक संजय धारीवाल यांनी ७० व्या भारतीय राजस्व सेवेतील तुकडीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. या तुकडीची एकूण संख्या १६८ असून २ अधिकारी रॉयल भूटान सेवेतून आले आहेत. तुकडीचे सरासरी वय २८ वर्ष असून सर्वात तरुण वयाचे अधिकारी २३ वर्षांचे तर ३७ वर्ष वयाचे अधिकारीही या तुकडीत आहेत. २६ टक्के महिला या तुकडीत समाविष्ट असून सर्वात जास्त ३२ अधिकारी उत्तर प्रदेशातील आहेत. ५४ टक्के अधिकारी अभियंते असून २० टक्के मानव्यशास्त्र, २० अधिकारी वैद्यकीय तज्ज्ञ, ३ अधिकारी सनदी लेखापाल आहेत. ६७ टक्के अधिकाऱ्यांना कामाचा अनुभव आहे.
अतिरिक्त महासंचालक आर.के. चौबे यांनी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी कर-प्रशासकाची प्रतिज्ञा घेतली. सूत्रसंचालन ६९ व्या भारतीय राजस्व सेवेतील तुकडीचे अधिकारी मेघा गर्ग यांनी तर आभार सहयोगी प्रशिक्षण संचालक अंजनी कुमार पांडे यांनी मानले. कार्यक्रमास आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ६९ व्या व ७० व्या भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Keeping the focus of disadvantaged groups should be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.