एकच दिवस बंद ठेवा, दुकानाची वेळ वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:02+5:302021-07-28T04:09:02+5:30
उमरेड : गत नऊ दिवसांपासून तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शिवाय बऱ्याच दिवसांपासूनही तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आली ...

एकच दिवस बंद ठेवा, दुकानाची वेळ वाढवा
उमरेड : गत नऊ दिवसांपासून तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शिवाय बऱ्याच दिवसांपासूनही तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. दुसरीकडे कोविड सेंटर सुद्धा कंत्राटी मनुष्यबळाअभावी कुलूपबंद अवस्थेत आहे. अशावेळी आता शासन-प्रशासनाने व्यवसाय, प्रतिष्ठाने आठवड्यातून एकच दिवस बंद ठेवावे. सोबतच वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी उमरेड येथील व्यापारी वर्गातून केली जात आहे. शासनाच्या सध्याच्या वेळापत्रकामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय बाजारपेठेचे दिवस आणि वेळ कमी करण्यात आल्याने बाजारपेठेत गर्दी उसळत आहे.
सध्या उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार नगरपालिका स्तरावर आठवड्यातून शनिवार आणि रविवार अशी तब्बल दोन दिवस दुकाने, प्रतिष्ठाने पूर्णत: (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवली जात आहेत. शिवाय सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकानांची, प्रतिष्ठानांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी सोमवारी ग्राहकांची गर्दी उसळते. मंगळवार आणि बुधवारी सुद्धा गर्दीचाच दिवस असतो. पुढील दोन दिवसांत दुकाने बंद राहणार असल्याच्या कारणावरून गुरुवार आणि शुक्रवारी सुद्धा सर्वत्र गर्दीच दिसून येते. शिवाय सायंकाळी ४ वाजताची अपुरी वेळ असल्याने दुकानात गर्दीचे प्रमाण वाढत आहे.
नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी आता आठवड्यातून केवळ एक दिवस (बुधवार) बंद ठेवण्यात यावा. तसेच सायंकाळी ४ वाजताऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकानांची वेळ नव्याने निश्चित करावी, अशी मागणी अशोक मने, सुधाकर खानोरकर, अनिल गोविंदानी, दामोधर मुधंडा, रामकुमार सारडा, चंद्रशेखर अग्रवाल, गोविंद सहजरामानी, घनश्याम सारडा, संजय मुंडले, अनंता अड्याळवाले, जगदीश हरडे, किशोर बेगानी, सुरेश चिचमलकर आदींनी केली आहे. येत्या काही दिवसांत बदल करण्यात न आल्यास आंदोलन करू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
---
मास्कचा पडला विसर
उमरेड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शून्य येत आहे. असे असले तरी काही नागरिक नियमावलींचे उल्लंघन करीत आहेत. मास्क, ठराविक अंतर आणि सॅनिटायझर याचा वापर शक्य त्याठिकाणी केलाच पाहीजे. शिवाय गर्दी टाळली पाहीजे, असे असतानाही असंख्य नागरिक मास्कचा सुद्धा वापर करताना दिसत नाहीत. कोरोना संपला की काय, अशा आविर्भावात अनेकांना मास्कचा विसर पडला आहे.
--
दंडात्मक कारवाई करा
नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर पालिकेने आतापर्यंत दंडात्मक कारवाई केलेली आहे. अलीकडे ही कारवाई बंद करण्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे दंडात्मक कारवाईची मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.
-