काटोलच्या कांबळे भगिनींनी मिळविले पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST2021-02-17T04:12:47+5:302021-02-17T04:12:47+5:30

काटोल : जिद्दीच्या बळावर यशोशिखर गाठणे सहज शक्य असते. ही उक्ती खरी करून दाखविली ती काटोल येथील टीव्ही दुरुस्ती ...

Katol's blanket sisters obtained patents | काटोलच्या कांबळे भगिनींनी मिळविले पेटंट

काटोलच्या कांबळे भगिनींनी मिळविले पेटंट

काटोल : जिद्दीच्या बळावर यशोशिखर गाठणे सहज शक्य असते. ही उक्ती खरी करून दाखविली ती काटोल येथील टीव्ही दुरुस्ती व्यावसायिक अशोक कांबळे यांच्या मुलींनी. अंकिता कांबळे व डॉ. पल्लवी कांबळे अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत केंद्र सरकार पेटंट कार्यालय यांच्याकडून स्वामित्व अधिकार प्राप्त केले आहे. अशोक कांबळे हे टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर त्यांनी दोन्ही मुलींना शिकविले. लहान मुलगी अंकिता ही श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जळगाव येथे एम.फार्म.च्या सहायक प्राध्यापिका आहेत. ‘अ प्रोसेस फॉर प्रीपरेशन ऑफ लिनेझोलिड नॅनोबायोकम्पोझिट फॉर सस्टेन्ड रिलिज’ या प्रबंधास त्यांना भारत सरकारच्या वतीने पेटंट मंजूर झाले आहे.

मोठी मुलगी डॉ. पल्लवी कांबळे इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, नांदेड येथे सहायक प्राध्यापिका आहेत. पीएच.डी.च्या ‘सिन्थेसिस अ‍ॅण्ड यूज ऑफ नोवेल फ्लावोनॉल डेरिव्हेटिव्ह अगेन्स्ट ल्युकेमिया’ या त्यांच्या प्रबंधास केंद्र सरकारच्या वतीने पेटंट जाहीर करण्यात आले आहे.

प्राध्यापिका अंकिता कांबळे आणि डॉ. पल्लवी कांबळे यांनी डॉ. एस.जे. वाढेर, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रबंध पूर्ण केलेले आहेत.

अशोक कांबळे ३० वर्षांपूर्वी काटोल येथे टीव्ही सर्व्हिस सेंटरचे कोर्सेस चालवायचे. कालांतराने त्यांचे इन्स्टिट्यूट बंद झाले. परिवाराचा उदरनिर्वाह चालावा यासाठी त्यांनी टीव्ही दुरुस्तीचे दुकान थाटले. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले, हे विशेष.

Web Title: Katol's blanket sisters obtained patents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.