‘कारवाँ-ए-अदब’ने श्रोते मंत्रमुग्ध
By Admin | Updated: November 5, 2014 00:53 IST2014-11-05T00:53:15+5:302014-11-05T00:53:15+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली,

‘कारवाँ-ए-अदब’ने श्रोते मंत्रमुग्ध
मुशायरा मैफिल : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजन
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली, वसीम बरेलवी, मुनव्वर राणा, राहत इंदौरी, गुलजार देहलवी, पापुलर मेरठी, नुसरत मेहंदी व मंजर भोपाली यांच्या शायरींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. केंद्र संचालक डॉ. पीयूषकुमार संयोजित ही मैफिल केंद्राच्या खुल्या मंचावर झाली.
‘दयारे दिलमे नया सा चिराग कोई जल रहा है, मै जिसकी दस्तक मुजावर था, वो लम्हा मुझे बुला रहा है’ अशाप्रकारे या मैफिलीतील प्रत्येक लम्हा श्रोत्यांसाठी यादगार बनून गेला. पद्मश्री निदा फाजली हे लफ्जों के फुल, मोर नाच अशा संग्रहांसह रजिया सुल्ताना, तमन्ना, सरफरोश अशा सिनेरचनांचे धनी आहेत. त्यांच्या खास ‘अपना गम लेके कही और न जाया जाए, घरमे बिखरी हुई चिजोको सजाया जाए, घरसे मज्जित है बहोत दूर, चलो यू करले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए’ या शायरीने मैफिल रंगतदार ठरली.
वसीम बरेलवी त्यांच्या ‘लोग पानी का फतरा ही समझे वसीम, कौन आसू के अंदर खुदा देखता’ या शेरच्या आठवणीने डोळे पाणावले. शायर मुनव्वर राणा यांच्या रचनांचे हिंदी, बंगाली व पाश्चात्य भाषेत अनुवाद झाले आहे. राणा यांचा ‘एक आसू भी खतरा है सियासत के लिए, तुमने देखा नही आँखो का समंदर होना’ हा शेर शासनकर्त्यांसाठी गर्भित इशाराच होता.
महिला शायर नुसरत मेहंदी मौलिक संदेश देऊन गेल्या. ‘औरत को ना बेचारी किजिए, हो सके तो हमारी तारीफ लिखिये, बेटियो के लिए भी हात उठाओ मंजर, अल्लाहसे सिर्फ बेटे नही मांगा करते’ अशा त्या म्हणाल्या. राहत इंदौरी, गुलजार देहलवी, नुसरत मेहंदी, हास्यकवी डॉ. पापुलर मेरठी, मंजर भोपाली व अनवर जलालपुरी यांनीही श्रोत्यांना रिझविले. ही मैफिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित करण्यात आली.
याप्रसंगी शायर शरीफ अहमद शरीफ यांच्या शेरो-शायरीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विकास मिश्रा, ओ.पी. सिंग, आलोक कन्सर, देवेंद्र पारीख, हबीब खान, डॉ. सतीश वटे प्रमुख अतिथी होते. शायर कासीम इमाम यांनी सूत्रसंचालन, तर श्वेता शेलगावकर यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)