सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्यास देणार ‘कांशीरामजी रत्न’
By Admin | Updated: March 16, 2017 02:27 IST2017-03-16T02:27:51+5:302017-03-16T02:27:51+5:30
बसपा हा कॅडर बेस पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडे हा कॅडर तुटत चालला आहे.

सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्यास देणार ‘कांशीरामजी रत्न’
बसपा प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर यांची घोषणा :
दर महिन्याला घेणार संघटनेचा आढावा
नागपूर : बसपा हा कॅडर बेस पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु अलीकडे हा कॅडर तुटत चालला आहे. त्यामुळे बसपाने आता संघटना मजबुतीवर अधिक लक्ष घालण्यात सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय कांशीराम यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी आयोजित बसपाच्या संघटन आढावा बैठकीत दिसून आला. या बैठकीला मार्गदर्शन करताना बसपाचे प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर यांनी सांगितले की, संघटनेच्या कामाचा आता दर महिन्याला आढावा घेण्यात येईल, यात प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचा आढावा घेतला जाईल. यातून संघटना वाढीसाठी ज्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे सर्वोत्कृष्ट कार्य केले असेल, त्याला ‘कांशीरामजी रत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी घोषणासुद्धा त्यांनी यावेळी केली.
बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनानिमित्त बसपातर्फे विदर्भ साहित्य संघाचे सभागृह सीताबर्डी येथे संघटना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, जिल्हा अध्यक्ष पृथ्वी शेंडे, को-आॅर्डिनेटर विवेक हाडके, रूपेश बागेश्वर, नवनीत धडाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
म्हैसकर यावेळी म्हणाले, कांशीराम यांचा संघटनेवर नेहमी भर राहत होता. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करावा. आता पक्षातर्फे दर महिन्याला संघटनेचा आढावा घेतला जाईल. यात कोणत्या कार्यकर्त्यावर कोणती जबाबदारी सोपविण्यात आली आहे, याचा आढावा गेतला जाईल. ज्याचे काम चांगले असेल त्याला सन्मानित केले जाईल. दर महिन्याला कांशीरामजी रत्न या पुरस्काराने कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल.
यावेळी श्रीधर साळवे, संजय सोमकुवंर, सहदेव पिल्लेवान, अमित सिंग, योगेश लांजेवार, राजू केकाडे, सोनु समर्थ, शेषराव सेलारे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
नगरसेवकांचा सत्कार
यावेळी नव्याने निवडून आलेल्या पक्षातील नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यात नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, मो. जमाल, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, ममता सहारे, विरंका भिवगडे, नरेंद्र वालदे, संजय बुरेवार आदींचा समावेश होता.