कन्हानमध्ये दोन गटात गोळीबार

By Admin | Updated: March 26, 2015 02:39 IST2015-03-26T02:39:59+5:302015-03-26T02:39:59+5:30

खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Kanhaan firing in two groups | कन्हानमध्ये दोन गटात गोळीबार

कन्हानमध्ये दोन गटात गोळीबार

कन्हान : खंडणी वसुलीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना कन्हान शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. रेतीघाटावर खंडणी वसुलीचा वाद उफाळल्याने दोन गटात हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटात देशीकट्ट्याने गोळीबार व जोरदार हाणामारी झाली.
कन्हानलगत असलेल्या सिहोरा रेतीघाटावर मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कमलेश मेश्राम गटाचे पाच-सहा व्यक्ती शस्त्रांसह पोहोचले व तेथील रॉयल्टी वसुलीच्या झोपडीत असलेला फैजाम इजहार अहमद (३५, रा. गुजरीबाजार, कामठी) यांना धमकी दिली. चारचाकी वाहनाने आलेल्या सर्व आरोपींनी तेथील उभ्या ट्रकचे लाईट व काचा फोडल्या, तसेच ट्रकचालकाला काठीने मारहाण केली. याबाबत फिर्यादी फैजाम अहमद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी कमलेश व इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ४२७ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, हे सर्व आरोपी रेतीघाटावरून कन्हान शहरातील विवेकानंदनगर येथील योगेश यादव यांच्या घरी गेले. योगेश यादव व कमलेश मेश्राम या दोघांमध्ये आपसी वाद असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील नारायणा शाळेलगत रात्री १०.३० ते १२.३० वाजताच्या सुमारास दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाल्याने धारदार शस्त्रे व देशीकट्ट्याचा वापर झाल्याचे समजते. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात योगेश यादव (२३) याच्या तक्रारीनुसार तो रेती सप्लायरचा व्यवसाय करीत असून कमलेशने त्याला खंडणीची मागणी केली होती. ती नाकारल्याने कमलेश व त्याच्या साथीदारांनी योगेश व त्यांच्या वडिलांच्या घरात शिरून तोडफोड केली. तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली व देशीकट्ट्याने गोळीबार करून त्याच्या कुटुंबीयांना जखमी केले. याबाबत कन्हान पोलिसांनी कमलेश मेश्राम, उमेश यादव, विक्की यादव, नीलेश यादव, आकाश मेहतो, मनोज रॉच, मुकेश शर्मा, मोनू मनपिया, ताज, आकाश चांभारे, दादा मुळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ व आरडब्ल्यू ३/२५ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर योगेश यादव गटाने कमेलश मेश्राम याच्या चिकन सेंटर व घरावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. कमलेशचा भाऊ नीलेश हरीचंद मेश्राम (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ११.३० वाजता योगेशने आपल्या साथीदारांसह त्यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील नीलेश व त्याचा भाऊ अकलेश, आई बारुबाई यांना धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले. तसेच कमेलशवर गोळीबार केला. यात पोलिसांनी योगेश यादव, राजा यादव, विपीन गोंडाने, गोलू यादव, राहुल व अन्य दोघांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३०७ नुसार गुन्ह्यांची नोंद केली.
या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी शहरात अतिशिघ्र कृती पोलीस दल तैनात केले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी कंत्तेवार यांनी भेट दिली.
या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसून ठाणेदार सुभाष माकोडे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

घटनेची पुनरावृत्ती
कन्हान परिसरातील खदान भागात १७ नोव्हेंबर २०११ ला शीतलसिंह ऊर्फ मिठू याच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी त्याची निर्घृण हत्या झाली. तसेच कन्हान येथील मोनिष रेड्डीवरही एकदा तारसा चौकात तर दुसऱ्यांदा ८ एप्रिल २०१३ ला एका जीममध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर २४ जानेवारी २०१४ ला त्याच्या राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. कन्हान व खदान भागात अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा असून या भागात ‘सर्च आॅपरेशन’ सुरू करण्याची मागणी आहे. मात्र पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शहरात गॅगवारसारख्या घटना घडत आहेत.

Web Title: Kanhaan firing in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.